सायरस मिस्त्रींच्या अपघाती निधनानंतर नितीन गडकरींची मोठी घोषणा, आता प्रत्येकाला...

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मोठी घोषणा केली आहे

Updated: Sep 6, 2022, 10:01 PM IST
सायरस मिस्त्रींच्या अपघाती निधनानंतर नितीन गडकरींची मोठी घोषणा, आता प्रत्येकाला... title=

टाटा सन्सचे (tata sons) माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) यांचे रविवारी रस्ते अपघातात निधन झाले. पारशी धर्मगुरूला भेटण्यासाठी ते गुजरातमधील उडवाडा येथे गेले होते. परतत असताना त्यांची कार डिव्हायडरला धडकली. हा अपघात इतका भीषण होता की मर्सिडीजचा पुढील भाग उडून गेला. सायरस मिस्त्री यांच्यासोबत आणखी तीन लोक होते, त्यापैकी एकाचा मृत्यू झाला असून दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मिस्त्री यांच्या पोस्टमॉर्टम रिपोर्ट (cyrus mistry post mortem report)नुसार छाती, डोके, मान आणि मांडीला गंभीर दुखापत झाल्याचे प्राथमिक अहवालात स्पष्ट झाले आहे. मिस्त्री यांना पॉलीट्रॉमा होता, जो एखाद्या व्यक्तीला गंभीर अंतर्गत जखमा झाल्यास होतो. 

सायरस मिस्त्री यांच्या अपघातानंतर सरकारने गंभीर दखल घेत याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच मिस्त्री प्रवास करत असलेल्या मर्सिडीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनीही या गाडीची पाहणी केली. मात्र चारोटी नाक्याजवळील सूर्या नदीच्या पुलाच्या कठडयाला त्यांच्या भरधाव कारची धडक बसल्याने मागील सीटवर बसलेल्या मिस्त्री आणि जहांगीर पंडोल यांचा मृत्यू झाला. गाडीला धडक बसताच ‘एअर बॅग’उघडल्या. मात्र सायरस मिस्त्री आणि जहांगीर यांनी सीटबेल्ट न लावल्याने ते फेकले गेले. यामुळे त्यांना गंभीर दुखापत झाली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

यानंतर आता केंद्र सरकारने प्रवाशांनी सीट बेल्ट लावण्यासंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari ) यांनी याची घोषणा केली आहे. नितीन गडकरी एका कार्यक्रमात बोलत होते.

कारमधील प्रत्येक प्रवाशाला आता सीटबेल्ट लावणे बंधनकारक असणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी ही माहिती दिली.  वाहनात मागच्या बाजूला बसणाऱ्या प्रवाशांनाही सीटबेल्ट लावणे बंधनकारक करण्यात आले आहे, असे गडकरी म्हणाले.

"आता कारमधील प्रत्येकाला सीट बेल्ट घालणे बंधनकारक असेल. सायरस मिस्त्री यांच्या निधनानंतर, आज सरकारने मागच्या सीटवरील प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मोठा निर्णय घेतला आहे. मागच्या सीटसाठीही सीट बेल्ट आवश्यक आहेत," असे नितीन गडकरी म्हणाले.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी  सांगितले की, मागच्या सीटवर बसलेल्या प्रवाशांनी सीट बेल्ट लावला नाही तर अलार्म वाजत राहणार आहेत. ड्रायव्हिंग सीटवर किंवा मागे बसलेली व्यक्ती असो कारमध्ये प्रत्येकाला सीट बेल्ट लावावाच लागणार आहे. ड्रायव्हरच्या मागच्या सीटवर बसलेल्या प्रवाशांनी सीट बेल्ट न लावल्यास त्यांना दंड ठोठावण्यात येईल. या संदर्भात येत्या 3 दिवसांत आदेश काढण्यात येणार आहे, असे नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.