पाटणा: मुसळधार पावसामुळे बिहारच्या दरभंगा जिल्ह्यात गंभीर पूरस्थिती निर्माण झाली आहे. मात्र, या प्रतिकूल परिस्थितीमध्येही स्थानिक प्रशासन मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या सरबराईत मग्न असल्याचे दिसून आले. यावरून नव्या वादाला तोंड फुटले आहे.
पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर नितीश कुमार यांनी नुकताच दरभंगा जिल्ह्याचा दौरा केला. यावेळी त्यांनी पूरग्रस्तांच्या छावण्यांनाही भेट दिली. यावेळी एका ठिकाणी नितीश यांच्या स्वागतासाठी पायघड्या घातल्याचा प्रकार समोर आला. सध्या दरभंगा परिसरात पुरामुळे लाखो लोक विस्थापित झाले आहेत. या लोकांना छावण्यांमध्ये ठेवण्यात आले आहे.
याठिकाणी त्यांना आवश्यक गोष्टी मिळवण्यासाठी झगडावे लागत आहे. मात्र, अशावेळी त्यांच्या या समस्यांकडे लक्ष देण्यापेक्षा सरकारी अधिकारी मुख्यमंत्र्यांच्या स्वागत सोहळ्यामध्येच गर्क असल्याचे दिसून आले.
नितीश कुमार हे मिर्झापूर येथील पूरग्रस्तांच्या छावणीत गेले असताना हा प्रकार घडला. यावेळी नितीश कुमार छावणीतील ज्या भागांना भेट देणे अपेक्षित होते त्याठिकाणी हिरव्या रंगाच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या. जेणेकरून माती लागून नितीश यांचे पाय खराब होऊ नयेत. हा प्रकार समोर आल्यानंतर विरोधक नितीश कुमार यांच्यावर तुटून पडले आहेत.
राष्ट्रीय जनता दलाच्या (राजद) नेत्या राबडी देवी यांनी नितीश यांच्यावर टीका करताना म्हटले की, हे केवळ बिहारमध्येच घडू शकते. लोक इतक्या हालअपेष्टा सहन करत असताना मुख्यमंत्र्यांचे अशाप्रकारे आगतस्वागत केले जाते, असा टोला राबडी देवी यांनी लगावला.
तर काँग्रेस नेते प्रेमचंद मिश्रा यांनी या प्रकारामुळे सरकार केवळ मदतीचा देखावा करत असल्याचा आरोप केला. मात्र, भाजपचे आमदार नवल किशोर यादव यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. विरोधी पक्ष किंवा प्रसारमाध्यमे मुख्यमंत्र्यांचे स्वागत कसे करायचे, हे ठरवू शकत नसल्याचे त्यांनी सांगितले.