नवी दिल्ली : संसदेचे हिवाळी अधिवेशन (Parliament Winter Session) आजपासून सुरू होत असून यावेळीही अधिवेशनात गदारोळ होण्याची शक्यता आहे. रविवारी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीतही (All Party Meeting) तणावपूर्ण वातावरण पाहायला मिळालं. आम आदमी पक्षाने (AAP) सभात्याग केला. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) या बैठकीला उपस्थित न राहिल्याने विरोधकांनी जोरदार टीका केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आवाहन
संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी संबोधित केलं. 'संसदेचे हे महत्त्वाचे अधिवेशन आहे. देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे, भारतात चारही दिशांना स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने सकारात्मक, जनहितासाठी, राष्ट्रहितासाठी सर्वसामान्य नागरिक अनेक कार्यक्रम करत आहेत. स्वातंत्र्यसैनिकांनी जे स्वप्न पाहिले होते ते पूर्ण करण्यासाठी देशातील सर्वसामान्य नागरिकही काही ना काही जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. भारताच्या उज्वल भविष्यासाठी हे एक चांगले लक्षण आहे.
संसदेच्या या अधिवेशनात आणि येणाऱ्या सर्व अधिवेशनांमध्ये देशहिताची चर्चा व्हावी, अशी देशाची इच्छा असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात म्हटलं आहे. भविष्यात संसद कशी चालवायची, तुम्ही किती चांगले योगदान दिले, किती सकारात्मक काम केले, याचं मूल्यपान केलं गेलं पाहिजे. कोणी किती विरोध केला आणि कोणी किती ताकदीने अधिवेशन थांबवलं हा निकष नसावा. सरकार प्रत्येक विषयावर खुल्या चर्चेसाठी तयार आहे आणि संसदेत प्रश्न आणि शांतता असावी, अशी आमची इच्छा आहे. अधिवेशन काळात सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यास आमचं सरकार तयार आहे. संसदेत चर्चा केली पाहिजे आणि कामकाजाची मर्यादा राखली पाहिजे, असं आवाहन पंतप्रधानांनी केलं आहे.
पंतप्रधान मोदी म्हणाले, 'देशातील 80 कोटी नागरिकांना या कोरोनाच्या संकटात आणखी त्रास होऊ नये, म्हणून प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत मोफत अन्नधान्याची योजना सुरू आहे. आता ही योजना मार्च 2022 पर्यंत वाढवण्यात आली आहे. देशाने लसीकरणाचा १०० कोटींचा टप्पा पार केला आहे. अशात आता कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटच्या बातम्या येत आहेत, त्यामुळे सर्वांनी सतर्कता बाळगवाी असं आवानही पंतप्रधानांनी केलं आहे.
हिवाळी अधिवेशनासाठी भाजपनेही रणनीती आखली आहे. भारतीय जनता पक्षाने (BJP)आपल्या संसदीय पक्षाच्या बैठकांमध्ये पक्षाच्या खासदारांची जास्तीत जास्त उपस्थिती ठेवण्याचा आग्रह धरला आहे तसंच त्यांना विरोधकांना तोंड देण्यासाठी तयार राहण्यास सांगितलं आहे. अधिवेशनाच्या एक दिवस आधी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (NDA) बैठकीदरम्यानही सत्ताधारी आघाडीच्या मित्रपक्षांनी समन्वय असण्यावर भर दिला. दरम्यान, कृषीविषयक कायदे मागे घेण्याच्या सरकारच्या निर्णयाचं एनडीएच्या काही मित्रपक्षांनी स्वागत केलं.