नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा (Coronavirus) नवा व्हायरस आढळल्यामुळे संपूर्ण जगात चिंतेचं वातावरण आहे. दुसरीकडे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी देखील याबाबत महत्त्वाची बैठक घेतली. पीएम मोदींनी लोकांना अधिक सतर्क राहण्याचे आणि नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
देशात कोविड-19 (Covid-19) ची ताजी स्थिती आणि लसीकरण अभियान (Vaccination Drive) बाबत पंतप्रधान मोदींनी माहिती घेतलीय. दोन तास चाललेल्या या बैठकीत अधिकाऱ्यांनी पंतप्रधान मोदी यांना नवा कोराना व्हायरस आणि त्याची इतर देशांमधील प्रभाव याबाबत माहिती दिली. पंतप्रधान कार्यालय (PMO) कडून जारी करण्यात आलेल्या माहितीत नियमांचे पालन करण्यासह सर्व आंतरराष्ट्रीय विमानांवर देखील लक्ष ठेवण्यास सांगण्यात आले आहे.
पीएमओच्या माहितीनुसार पंतप्रधानांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत की, आंतरराष्ट्रीय विमानांची तपासणी व्हावी. त्या देशांमध्ये धोका अधिक आहे अशा सर्व देशांमधून येणाऱ्या लोकांची चाचणी करण्यात यावी. कोरोनाच्या नव्या रुपाबाबत (New Covid-19 Variant) पंतप्रधानांनी आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर प्रतिबंध घालता येईल का याबाबत ही चर्चा केली.
एका दिवसात कोविड-19 चे 8,318 नवीन रुग्ण आढळून आल्याने, संसर्गाच्या एकूण रुग्णांची संख्या 3,45,63,749 वर पोहोचली आहे, तर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 1,07,019 वर आली आहे, जी 541 दिवसांतील सर्वात कमी आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, 465 रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळे मृतांची संख्या 4,67,933 झाली आहे.
या देशांनी निर्बंध लादले
या सगळ्या दरम्यान, दक्षिण आफ्रिकेत कोविड-19 च्या नवीन स्वरूपाच्या आगमनाने अनेक देशांची चिंता वाढली आहे आणि त्यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) च्या समितीने कोरोना विषाणूच्या या नवीन स्वरूपाला 'ओमिक्रॉन' असे नाव दिले आहे आणि त्याला 'अत्यंत संसर्गजन्य चिंताजनक प्रकार' असे म्हटले आहे. कोरोना विषाणूचा हा नवीन प्रकार समोर आल्यानंतर युरोपियन युनियनसह अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, रशिया आणि इतर अनेक देशांनी आफ्रिकन देशांतील लोकांच्या येण्यावर बंदी घातली आहे.