अहमदाबाद : जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांचं अहमदाबादमध्ये आगमन झालंय. मोदींनी शिंजो आबे आणि त्यांच्या पत्नीचं यांचं अहमदाबाद विमानतळावर स्वागत केलं. आबे यांना अलिंगन देत मोदींनी त्यांचं स्वागत केलं. यावेळी आबेंना विमानतळावरच गार्ड ऑफ ऑनर देण्यात आलं.
मोदी आणि आबे यांच्या रोड शोला सुरुवात झाली आहे. एअरपोर्टपासून साबरमती आश्रमपर्यंत जवळपास 8 किलोमीटर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिंजो आबे रोड शो करणार आहेत. रोड शो दरम्यान २८ ठिकाणी ३० हून अधिक स्टेज बनवलेत. या स्टेजवरून वेगवेगळ्या राज्यांतील सांस्कृतीचं दर्शन घडणार आहे.
साबरमती आश्रमात पोहचल्यानंतर दोन्ही नेते महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहणार आहेत. साबरमती आश्रमात भेट दिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिंजो आबे ऐतिहासिक सिदी सैयद मशिदीत जाणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिंजो आबे मागील ३ वर्षात एकमेकांना १० वेळा भेटलेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिंजो आबे गुरूवारी साबरमती रेल्वे स्टेशनजवळ अहमदाबाद-मुंबई हायस्पीड बुलेट ट्रेन प्रकल्पाचं भूमिपूजन करणार आहेत. या कार्यक्रमात १० हजाराहून अधिक लोक सहभागी होणार आहेत. गुरूवारी भूमिपूजन झाल्यानंतर दोन्ही नेते १५ हून अधिक करारावर स्वाक्ष-या करणार आहेत.