Punjab Result : पंजाबमध्ये आता आम आदमी पक्षाचं सरकार य़ेणार आहे. 'आप' दिल्लीच्या सीमा ओलांडत आता आणखी एका राज्यात आपलं सरकार स्थापन करणार आहे. आपने बहुमताच्या आकड्याच्याही पुढे जात मोठा विजय मिळवला आहे. आपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार भगवंत मान यांनी 45 हजार मतांनी विक्रमी विजय मिळवला आहे. दुसरीकडे विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर नवज्योतसिंग सिद्धू यांनी पंजाब काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. (Navjyot Singh Sidhu has resigned as Punjab Congress president)
विजयानंतर भगवंत मान यांनी पंजाबच्या जनतेला संबोधित केले. ते उद्या मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. शपथविधी सोहळा राजभवनाऐवजी शहीद आझाद भगतसिंग यांचे मूळ गाव असलेल्या खटकर कलान येथे होणार आहे. यापूर्वी राजभवनात मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी होत होता. शपथ घेण्यापूर्वी भगवंत मान हे हुतात्मा स्मारकावर जाऊन अभिवादन करणार आहेत.
दुसरीकडे पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा 13 हजार मतांनी तर सुखबीर सिंह बादल यांचा 12 हजार मतांनी पराभव झालाय. विद्यमान मुख्यमंत्री चन्नी आणि काँग्रेसचे प्रमुख नवज्योतसिंग सिद्धू यांनाही पराभवाला सामोरे जावे लागले आहे. विशेष म्हणजे काँग्रेस, अकाली दल आणि भाजपसह त्यांचे मित्रपक्ष मिळून 'आप'च्या जवळपास एक चतुर्थांश भागापर्यंत पोहोचू शकले आहेत.
पंजाबमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसच्या हातातून आणखी एक राज्य गेलंय. काँग्रेस पक्षाला अतंर्गत वाद आणि मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवारीवरुन मोठं नुकसान सहन करावं लागलं आहे.