बेळगाव : कर्नाटक रक्षण वेदिकेने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना आमंत्रण दिले आहे. प्रादेशिक भाषा अस्मितेची मोट बांधण्यासाठी एक दिवसीय चर्चा शिबिराचं बंगळुरूत आयोजन करण्यात आले आहे.
येत्या शनिवारी हे एक दिवसीय चर्चा शिबिर होते आहे. देशभरात प्रादेशिक भाषा अस्मिता कडवटपणे जपणाऱ्या राजकीय पक्ष आणि संघटनांना या शिबिरासाठी आमंत्रण देण्यात आले आहे. यामध्ये मनसे सहभागी होणार असल्याचं सांगण्यात आले आहे. पक्षाचे नवनियुक्त सरचिटणीस संदीप देशपांडे यांना भूमिका मांडण्यासाठी पाठवण्यात येणार आहे.
शिवसेनेला अद्याप आमंत्रण नसल्याची सूत्रांची माहिती आहे. हिंदुत्व आणि प्रादेशिक भाषा अस्मिता अशा दोन्ही दगडांवर पाय असल्यानं शिवसेनेला सहभागी न करून घेण्याकडे आयोजकांचा कल असल्याचं समजतंय. बंगळुरूमध्ये मेट्रो स्थानकांच्या हिंदी भाषेत नामकरणाचा वाद पेटलाय. त्या पार्श्वभूमीवर या शिबिराचं आयोजन करण्यात आले
आहे.
डीएके, एआयडीएमके, तेलगू देसम, तृणमूल काँग्रेस, अशा सर्वांनाच आमंत्रण देण्यात आलेय. भाषा अस्मितेसाठी प्रसंगी राज्यांमधले आपापसातले टोकाचे मतभेद बाजूला ठेवत हिंदी भाषा अतिक्रमण विरोधी लढा उभारण्यासाठी प्रादेशिक मोट बांधण्याचा कर्नाटक रक्षण वेदिकेचा हेतू आहे.