नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी विरोधकांकडून सरकारवर होत असलेल्या टीकेला प्रत्यूत्तर दिलंय. पाकिस्तानला प्रत्यूत्तर देणं काँग्रेस सरकारनं आपल्या कार्यकाळात नेहमीच टाळलं, पण नरेंद्र मोदी सरकारनं मात्र हे बदललं, असं म्हणत मोदी सरकारवर त्यांनी कौतुकाचा वर्षाव केलाय. पुलवामा हल्ल्याचं प्रत्यूत्तर म्हणून भारतानं पाकिस्तानातल्या दहशतवादी अड्ड्यांवर निशाणा साधल्याचं त्यांनी म्हटलंय. ते कानपूरमध्ये बोलत होते. 'जे लोक वायुसेनेनं पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्याचे पुरावे मागत आहेत ते देशद्रोही आहेत' असं देखील त्यांनी म्हटलंय.
दुसरीकडे, दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर असणाऱ्या नरेंद्र मोदींनीदेकील पाकिस्तानी सीमेच्या आता घुसून केलेल्या एअर स्ट्राईकवर प्रश्नचिन्ह उभं करणाऱ्यांना फैलावर घेतलंय. 'मी तुम्हाला विचारू इच्छितो, सेना जे काही सांगतेय त्यावर तुमचा विश्वास नाही का?' असा प्रश्नही त्यांनी यावेळी जनतेला केला. यावेळी 'आज आपल्याकडे राफेल विमान असतं तर परिणाम काही औरच असते... काही लोकांना हे समजूनच घ्यायचं नसेल तर मी काहीही करू शकत नाही' असं म्हणत त्यांनी विरोधकांना टोला लगावलाय.
दहशतवादाचा बिमोड व्हायला हवा, असं देशवासियांना वाटतंय. मी म्हटलं होतं की जर राफेल वेळेवर मिळालं असतं तर आज स्थिती वेगळी असती... परंतु, ते म्हणतायत की मोदींनी आपल्या वायुसेनेच्या हवाई हल्ल्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. समजूतदारपणा वापरा... मी केवळ इतकंच म्हटलं होतं की आपल्यावर झालेल्या हवाई हल्ल्यादरम्यान आपल्याकडे राफेल असतं तर ना आपलं विमान कोसळलं असंत, ना त्यांचं कोणतं विमान वाचलं असतं... दहशतवादाची मुळं शेजारच्या देशात आहेत. आपल्याला या रोगावर मुळापासूनच उपाय करायला लागतील, असंही त्यांनी म्हटलंय. जर भारताचा नाश करण्याचा विचार करत असाल तर भारत शांत बसणार नाही. भारताला नुकसान पोहचवणाऱ्यांवर योग्य वेळीच कारवाई केली जाईल, असंही मोदींनी म्हटलंय.