लखनऊ : जानदार, जबरदस्त... जिंदाबाद असा आजचा योगी आदित्यनाथांचा विजय. उत्तर प्रदेशात पाच वर्षं मुख्यमंत्री राहून पुन्हा मुख्यमंत्री होण्याचा करिष्मा फक्त योगींनी करुन दाखवला आहे. हा विजय योगींचा आणि मोदींचा. उत्तर प्रदेशच्या भूमीनं पुन्हा एकदा मोठ्या विश्वासानं सत्तेची कमानं योगी आदित्यनाथांच्या हाती सोपवलीय. (up assembly elections 2022 results bjp yogi adityanath to retain power in uttar pradesh)
उत्तर प्रदेशातल्या या गुलालानं योगींचा मार्ग तर प्रशस्त केलाच. पण मोदी-शाह यांची जोडगोळी पुन्हा एकदा हिट ठरलीय. ब्रँड मोदी आणि ब्रँड योगींची ही नॉटआऊट अडीचशे पारची पार्टनरशिप.
योगी उत्तर प्रदेशात सलग पाच वर्षं कार्यकाळ पूर्ण करुन पुन्हा सत्ता मिळवणारे पहिले मुख्यमंत्री. योगी हे 1985 नंतर सलग सत्तेत येणारे पहिलेच मुख्यमंत्री. योगींची स्वच्छ प्रतिमा, कामाचा धडाका आणि विकासकामांना मिळालेली ही पोचपावती. विकासकामांच्या जोडीला राममंदिर आणि काशी विश्वनाथ कॉरिडोरचा फायदा भाजपला मिळाला.
कृषी विधेयकं वेळीच मागे घेण्याची भाजपची रणनिती यशस्वी ठरली. मोदी आणि अमित शाह यांचं गारुड अजूनही मतदारांवर कायम आहे. मोदींच्या प्रखर राष्ट्रवादाचा परिणाम म्हणजे हे यश आहे. अखिलेश यादव मोदींना तगडी टक्कर देऊ शकतील, असं बोललं जात होतं. मात्र उत्तर प्रदेशच्या जनतेनं सायकलपेक्षा कमळावरच दृढ विश्वास दाखवला.
विशेष म्हणजे जे लखिमपूर प्रकरण देशभरात पेटलं, तिथल्या मतदारांनीही भाजपचे 8 पैकी ८ उमेदवार निवडून दिले. योगींनी मांडलेल्या ८०-२० मतदानाच्या फॉर्म्युलावर मतांच्या ध्रुवीकरणाचे आरोप झाले. पण ही स्ट्रॅटेजी यशस्वी झाली. केंद्रात आणि राज्यात एकाच पक्षाचं सरकार ही डबल इंजिनची आयडिया मतदारांना भावली आणि भाजपची ट्रेन सुसाट धावली.
तिकडे उत्तराखंडमध्येही मतदारांनी भाजपला विजयाचं सरप्राईज दिलं. तमाम एक्झिट पोल्सना खोटं ठरवत उत्तराखंडची जनता भाजपच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. उत्तराखंडात मुख्यमंत्री बदलण्याची वेळ भाजपवर दोनदा आली. मात्र जो अकार्यक्षम असेल त्याला भाजपमध्ये स्थान नाही, हा स्ट्रॉंग मेसेजही भाजपनं मतदारांना दिला.
उत्तराखंडात मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींचा पराभव झाला. तरीही मोदींवर भरवसा ठेवत उत्तराखंडात कमळच फुललं. मणिपूरमध्ये काँग्रेसनं तब्बल सहा पक्षांबरोबर आघाडी केली होती. तरीही मणिपूरच्या जनतेनं भाजपची साथ सोडली नाही.
भाजपचा चार राज्यांमधला हा विजय अनेकार्थांनी महत्त्वाचा ठरलाय. मात्र सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उत्तर प्रदेशातल्या दमदार यशामुळे मोदी, शाह यांच्या तोलामोलाचा भाजपला तिसरा नेता मिळाल्याचं स्पष्ट झालंय. त्यामुळे योगी हे मोदींचे वारसदार ठरणार का, हे पुढचा काळ ठरवणार आहे.