Nitish Kumar Statment : बिहार (Bihar) विधानसभेत एका वक्तव्यामुळं मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी अनेकांचाच रोष ओढावला. ज्यानंतर अनेक वर्गांतून त्यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात आली. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीसुद्धा नितीश कुमार यांना खडे बोल सुनावले. ज्यानंतर आता परदेशातूनही यावर प्रतिक्रिया येताना दिसत आहेत.
नुकतंच अमेरिकन गायिका आणि अभिनेत्री मेरी मिलबेननंही नितीश कुमार यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निशाणा साधत आपली भूमिका स्पष्ट केली. लोकसंख्या नियंत्रणाच्या बाबतीत बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी केलेलं वक्तव्य पाहता, महिलांसाठी त्यांना केलेलं वक्तव्य अपमाननास्पद असल्याचं ती म्हणाली. शिवाय बिहारच्या मुख्यमंत्रीपदासाठी आता एका योग्य व्यक्तीचीच गरज असल्याचंही ती म्हणाली.
X वर पोस्ट लिहित तिनं लिहिलं, 'तीश कुमार यांचं वक्तव्य पाहता मला असं वाटतं की महिलांनी धाडसानं पुढे येत आता बिहारच्या मुख्यमंत्रीपदावर आपली उमेदवारी घोषित करावी. मी जर भारतीय नागरिक असते तर मी थेट बिहारमध्येच गेले असते आणि बिहारच्या मुख्यमंत्रीपदासाठी निवडणूक लढले असते'. नितीश कुमार यांच्याकडे असणारं मुख्यमंत्रीपद हिसकावण्याचंच आव्हान या गायिकेनं दिलं आणि अनेकांच्या नजरा वळवल्या असं म्हणणं गैर ठरणार नाही.
नितीश कुमार यांच्यावर ताशेरे ओढत असतानाच मिलबेननं पंतप्रधान मोदी यांची महिलांप्रती असणारी भूमिका, महिलांना असणारा त्यांचा पाठिंबा पाहता त्यांचं कौतुक केलं. देशातील नागरिकांच्या प्रतीच्या दृष्टीनं पंतप्रधान मोदी एक उत्तम नेता म्हणून जगापुढं आल्याच्या वक्तव्यावर तिनं जोर दिला. बिहारच्या महिलांना सशक्त करण्यासाठीसुद्धा त्यांनी अनेक पावलं उचलली असून, तिथं मोदींसारखाच नेता होणं गरजेचं आहे असंही ती म्हणाली.
लोकसंख्या नियंत्रणाबाबत वक्तव्य करत असताना महिलांमध्ये शिक्षणाचा प्रसार करण्याची गरज असल्याचं वक्तव्य त्यांनी बिहार विधानसभेत केलं. यावेळी एक शिक्षित महिलाच पतीला शरीसंबंध ठेवताना रोखू शकते असं म्हणत त्यांनी वापरलेली भाषा रोष ओढावण्यास कारणीभूत ठरली.
दरम्यान, वरील वक्तव्यानंतर झालेला वाद आणि पंतप्रधानांसह अनेकांनीच ओढलेले जाशेरे पाहता नितीश कुमार यांनी जाहीर माफीही मागितली. करण्यात आलेल्या वक्यव्यामुळं कोणाच्याही भावना दुखावल्या गेल्यास त्यासाठी मी माफी मागतो अशी नरमाईची भूमिका त्यांनी घेतल्याचं पाहायला मिळालं.