महाराष्ट्रासह अनेक राज्यात बनावट कंपन्या, 102 कोटींचा कर बुडवणारा मास्टरमाईंड अटकेत

आरोपीने 2017 ते 2019 या कालावधीत तब्बल 126 बनावट कंपन्या स्थापन केल्या होत्या

Updated: Sep 27, 2021, 09:32 PM IST
महाराष्ट्रासह अनेक राज्यात बनावट कंपन्या, 102 कोटींचा कर बुडवणारा मास्टरमाईंड अटकेत title=

आगरा : सरकराची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचं एक प्रकरण उत्तर प्रदेशमधल्या (Uttar Pradesh) आगरा (Agra) इथं उघडकीस आलं आहे. तब्बल 126 बनावट कंपन्या उघडून 700 कोटी रुपयांच्या बनावट पावत्यांद्वारे 102 कोटींचा कर बुडवणाऱ्या एका टोळीचा भंडाफोड करण्यात आला आहे. केंद्रीय जीएसटी अधिकाऱ्यांनी टोळीचा मास्टर माईंड नितीन वर्माला आगऱ्यातल्या विकास कॉलनी इथून अटक केली आहे.

या टोळीचा मास्टर माईंड असलेल्या नितीन वर्माने 2017 ते 2019 या कालावधीत तब्बल 126 बनावट कंपन्या सुरु केल्या. सामान्य लोकांची दिशाभूल करुन त्यांच्या आधारकार्डद्वारे बनावट फर्म उघडण्यात आल्या होत्या. पोलिसांच्या तपासात नितीन वर्माच्या नावावर दोन आधारकार्ड असल्याचं समोर आलं. दोन्ही आधारकार्डवर त्यानं वडिलांचं नाव वेगळवेगळं दाखवलं होतं. आरोपींची सर्व बँक खाती गोठवण्यात आली आहेत.

अनेक राज्यात बनावट कंपन्या

आरोपी नितीन वर्माचा सहकारी चंद्रप्रकाश कृपलानी याला जानेवारी 2020 मध्ये सीजीएसटीने अटक केली होती. आरोपींनी महाराष्ट्रासह कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये बनावट फर्म नोंदणीकृत केली. 6 महिन्यांनंतर, आरोपी आयटीसीचा दावा करून करोडोची ई-बे बिलं बंद केली जात होती. 

करोडोंची माया जमवली

सीजीएसटीचे अधीक्षक आरडी सिंह यांनी सांगितले की, आरोपींकडून वसुलीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. 100 कोटींपेक्षा जास्त कर चुकवणारा आरोपी नितीन वर्मा ऐशोआरामाचं आयुष्य जगत होता. तो सतत परदेश दौरेही करत असे. त्याने काळ्या पैशाने अनेक बेनामी संपत्ती जमा केली आहे. नितीन वर्माचे काही राजकारण्यांशी जवळचे संबंध असल्याचंही बोललं जात आहे.