नवी दिल्ली : पत्रकार रामचंद्र छत्रपती हत्येप्रकरणी आज पंचकुलातील विशेष CBI कोर्टाने राम रहिमला जन्मठेपाची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणात राम रहीम मुख्य आरोपी होता. सध्या दोन महिला साध्वींवर अत्याचारप्रकरणी राम रहीम तुरुंगातच आहे. राम रहिमला 20 वर्षाची शिक्षा झाली आहे. याआधी विशेष सीबीआय कोर्टात सुनावणी दरम्यान या प्रकरणात आरोपी किशनलाल, निर्मल आणि कुलदीप यांना दोषी ठरवलं होतं. रोहतकच्या तुरुंगात बंद असलेल्या गुरमीत राम रहीमला व्हिडिओ कॉन्फरेंसिंगद्वारे हजर करण्यात आलं. गुरमीतसह किशनलाल, निर्मल आणि कुलदीप यांच्यावर सिरसामधील पत्रकार रामचंद्र छत्रपती यांची हत्या केल्याचा आरोप होता.
रामचंद्र छत्रपती हत्याप्रकरणात सीबीआयचे साक्षीदार पत्रकार आरके सेठी यांनी कोर्टात राम रहीमला फाशी देण्याची मागणी केली होती. रामचंद्र छत्रपती यांची 21 नोव्हेंबर 2002 रोजी गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. छत्रपतींनी साध्वींसोबत झालेल्या अत्याचाराचा खुलासा केला होता. छत्रपती यांनी आपल्या वर्तमानपत्रात 'पूरा सच'मध्ये या संबंधित एका साध्वीचं पत्र देखील प्रकाशित केलं होतं. या प्रकरणात 2003 मध्ये एफआयआर दाखल करण्यात आली होती. 2006 मध्ये हे प्रकरण सीबीआयला सोपवण्यात आलं होतं. छत्रपती यांचा मुलांनी मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती. सीबीआयने देखील फाशीची शिक्षेची मागणी केली आहे.
आज कोर्टात सुनावणीच्या पार्श्वभूमीवर हरियाणा पोलिसांनी चोख सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे. साध्वी यौन शोषण प्रकरणात राम रहीम दोषी ठरल्यानंतर पंचकुला आणि हरियाणामध्ये त्याच्या अनुयायांनी हिंसा घडवली होती. यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. आजही पंजाब आणि हरियाणामध्ये पोलिसांनी चोख सुरक्षा व्य़वस्था ठेवली आहे.