Rahul Gandhi News : काँग्रेस नेते राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) उमेदवारीमुळं रायबरेली मतदारसंघ पुन्हा एकदा चर्चेत आलाय. अमेठीऐवजी (Amethi) यावेळी राहुल गांधींनी रायबरेलीतून (Rae bareli) मतदारसंघाची निवड केली. केरळमधील वायनाडपाठोपाठ आता उत्तर प्रदेशातील रायबरेलीतून ते खासदारकीची निवडणूक लढवत आहेत. तर अमेठीतून काँग्रेसनं गांधी घराण्याचे विश्वासू के. एल. शर्मा यांना उमेदवारी दिलीय. अमेठीऐवजी रायबरेलीची निवड करून काँग्रेस आणि राहुल गांधींनी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिलाय.
2004 पासून राहुल गांधी लागोपाठ तीनवेळा उत्तर प्रदेशच्या अमेठीतून खासदार म्हणून विजयी झाले होते. 2019 मध्ये केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी (Smriti Irani) यांनी त्यांचा पराभव केला. राहुल गांधींची मतांची टक्केवारी 71.78 टक्क्यांवरून 43.84 टक्क्यांपर्यंत घसरली. भाजपकडे शिफ्ट झालेली ही 28 टक्के मतं पुन्हा परत येण्याची खात्री नसल्यानंच अमेठीला टाटा, बाय बाय करण्याचा निर्णय राहुल गांधींनी घेतल्याचं समजतंय. याउलट रायबरेली हा मतदारसंघ राहुल गांधींसाठी सेफ मानला जातोय.
रायबरेली का निवडली?
रायबरेली हा नेहरू-गांधी घराण्याचा परंपरागत मतदारसंघ आहे. इंदिरा गांधी, त्यांचे पती फिरोज गांधी यांच्यापासून सोनिया गांधींपर्यत तब्बल 16 वेळा गांधी-नेहरू कुटुंबातील व्यक्ती इथून खासदार म्हणून विजयी झालीय. 1977 मध्ये जनता पार्टीच्या राज नारायण यांनी रायबरेलीतून इंदिरा गांधींचा पराभव केला होता. मात्र 1980 मध्ये इंदिरा गांधी तिथून पुन्हा खासदार म्हणून निवडून आल्या. 2004 पासून लागोपाठ पाचवेळा सोनिया गांधी इथून खासदार आहेत. निवडणुकीच्या राजकारणातून सोनिया गांधी यांनी संन्यास घेतल्यानंतर आता रायबरेलीतून राहुल गांधी लोकसभा लढवत आहेत.
दरम्यान, राहुल गांधींनी अमेठी सोडून रायबरेलीची वाट धरल्यानं भाजपनं जोरदार हल्लाबोल केलाय. उत्तर प्रदेशात लोकसभेच्या तब्बल ८० जागा आहेत. काँग्रेस आणि समाजवादी पार्टी युती करून यंदा निवडणूक लढवत आहे. गांधी घराण्यातील किमान एका व्यक्तीनं उत्तर प्रदेशातून लढलं पाहिजे, अशी अपेक्षा अखिलेश यादव यांनी व्यक्त केली होती. आता रायबरेलीतून निवडून येण्याचं आव्हान राहुल गांधींसमोर असणार आहे.
राहुल गांधी म्हणतात...
रायबरेलीमधून उमेदवारी हा माझ्यासाठी भावनिक क्षण होता. माझ्या आईने माझ्यावर खूप विश्वास टाकला आहे आणि मला कुटुंबाची सेवा करण्याची संधी दिली आहे, माझ्यासाठी अमेठी आणि रायबरेली हे दोन्ही वेगळे नाहीत. 40 वर्षांपासून मतदारसंघाची सेवा करणारे किशोरी लाल जी अमेठीतून पक्षाचे प्रतिनिधित्व करतील याचा मला आनंद आहे. अन्यायाविरुद्ध सुरू असलेल्या न्यायाच्या लढाईत मी माझ्या प्रियजनांचे प्रेम आणि आशीर्वाद मागतो. संविधान आणि लोकशाही वाचवण्याच्या या लढ्यात तुम्ही सर्व माझ्या पाठीशी उभे आहात असा मला विश्वास आहे, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, राहुल गांधींना रायबरेलीतून उमेदवारी देऊन काँग्रेसनं भाजपला चकवा दिला आहे. परंतु अमेठीतून राहुल गांधींनी पळवाट काढल्याचा संदेश जनतेत गेल्यामुळे राहुल गांधींच्या प्रतिमेला तडा गेला आहे. तर तिकडे भाजपनं अमेठी काँग्रेसमुक्त केल्यानंतर आता रायबरेली काँग्रेसमुक्त करण्यासाठी कंबर कसलीय. भाजपला कितपत यश मिळतंय हे निकालातून कळेल.