चेन्नई : एका महिलेने आपल्या सहा महिन्याच्या मुलाची हत्या करून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या महिलेच्या मुलाला डेंग्यू झाला होता. मुलाच्या उपचारासाठी पैसे नसल्याने असहाय्यतेपोटी महिलेने हे भयंकर पाऊल उचलले. तामिळनाडू येथील नमक्कल जिल्ह्यात ही घटना घडली आहे. पी अनबुकोडी असे या मृत महिलेचे नाव असून ती बेलुकरुची येथे राहणारी आहे. तिच्या मुलाचं नाव सर्विन होतं. अनबुकोडी यांचा पती पेरियासामी याचं सलून आहे.
रविवारी संध्याकाळी सर्विन आजारी पडला. अनबुकोडी आणि पेरियासामी हे दोघे त्याला घेऊन एका खासगी रुग्णालयात गेले होते. पेरियासामी यांच्या एका नातेवाईकाने दिलेल्या माहितीनुसार, मुलाची तपासणी केल्यानंतर त्याला डेंग्यू झाल्याचे निदान झाले. त्यांनी सांगितलं की, 'हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी मुलाच्या उपचारासाठी दिवसाला चार हजार रुपये खर्च येईल असं सांगितलं.'
अनबुकोडी आणि पेरियासामी सोमवारी रात्री ११ वाजता आजारी मुलाला घेऊन घरी परतले. पैसा नसल्याने आपल्या मुलावर उपचार करु शकत नाही आहोत याचं अनबुकोडी यांना प्रचंड दु:ख झालं. पेरियासामी यांनी अनबुकोडी यांना समजावण्याचा प्रयत्न केला. रात्री जवळपास तीन वाजण्याच्या दरम्यान पेरियासामी यांना झोप लागली. रात्री तीन वाजून 45 मिनिटांनी जेव्हा पेरियासामी यांना जाग आली तेव्हा अनबुकोडी आणि सर्विन आपल्या जागेवर नव्हते.
पेरियासामी यांनी बायको आणि मुलाचा शोध घेण्यास सुरुवात केली. खूप शोध घेतल्यानंतर बायको अनबुकोडीने मुलाला घेऊन विहीरीत उडी मारुन आत्महत्या केल्याचं त्यांना कळलं. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.