उद्धव ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची 8 फेब्रुवारी रोजी गोळी झाडून हत्या करण्यात आली. मॉरिस नरोन्हा याने कार्यालयात फेसबुक लाईव्ह केल्यानंतर अभिषेक घोसाळकरांना गोळ्या झाडल्या. त्यानंतर स्वतः देखील आत्महत्या केली. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. अभिषेक घोसाळकर यांचा 14 फेब्रुवारी रोजी लग्नाचा वाढदिवस पण या अगोदरच त्यांचा घात झाला. आज अभिषेक घोसाळकर आणि तेजस्विनी घोसाळकर-दरेकर यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे. यानिमित्ताने त्यांनी अभिषेक घोसाळकर यांच्याच फेसबुक पेजवरुन एक स्टोरी शेअर केली आहे. या स्टोरीला अधुरी एक कहाणी हे गाणंही जोडलं आहे.
अभिषेक घोसाळकर आणि तेजस्विनी घोसाळकर यांचा व्हॅलेंटाईन डे दिवशी लग्नाचा वाढदिवस आहे. यानिमित्ताने तेजस्विनी घोसाळकर यांनी अभिषेक घोसाळकर यांच्या फेसबूक वॉलवर एक स्टोरी शेअर केली आहे. “स्वर्गात असलेल्या माझ्या प्रिय नवऱ्यासाठी. मला तुमच्याबरोबर संपूर्ण आयुष्य घालवायचं होतं. परंतु, आता मला समजलं की, तुम्हीच तुमचं संपूर्ण आयुष्य माझ्याबरोबर घालवणार आहात. मला माहितेय की, तुमच्या शेवटच्या श्वासापर्यंत तुम्ही माझ्यावर प्रेम केलंत आणि आता पुन्हा भेटेपर्यंत तुम्ही वरूनही माझ्यावर असेच प्रेम करत राहाल. लग्नाच्या वाढदिवसाच्या स्वर्गीय शुभेच्छा. मला तुमची फार आठवण येते.
जोडीदाराची सवय आणि असा आलेला विरह हा प्रत्येकासाठी त्रासदायक असतो. लग्न म्हणजे फक्त संसार नाही तर ते एक नातं असतं. एकमेकांना एकमेकांची लावलेली सवय असते. एखादा जोडीदार जेव्हा अशा पद्धतीने सोडून जातो तेव्हा त्याचा विरह सहन करणे कठीण असते. अशावेळी आलेलं एकटेपण मरण यातनेशिवाय कमी नसते.
जोडीदारासोबतचा असा विरह सहन करणे अनेकांना कठीण होतं. पण कधी मुलांसाठी तर कधी स्वतःसाठी ही परिस्थिती स्वीकारणे अत्यंत गरजेची असते. अशावेळी जोडीदारासोबत घालवलेला वेळ हा अत्यंत महत्त्वाचा ठरतो. एकमेकांनी एकमेकांना दिलेली वचनंच पुढील आयुष्यासाठी एक आशेचा किरण होऊन जातो.
जोडीदार अशा पद्धतीने आयुष्यातून निघून गेल्यावर अर्धवट राहिलेला संसार एकच व्यक्ती खेचून नेत असतो. संसार कायमच दोन चाकांवर चालत असतो. पण एकाच व्यक्तीने असा संसार खेचून ते सांभाळणे यासाठी खूप जीगर लागतो. कारण पावलोपावली आपल्या जोडीदाराची येणार आठवण तुम्हाला आतून दुःखी करत असतं. मनात दुःख ठेवून समाजासाठी किंवा मुलांसाठी जगणं हे मागे राहिलेल्या पार्टनरचं काम असतं.