अमर काणे / नागपूर : Nagpur Zilla Parishad 1.23 crore fraud : सदर पोलीस स्टेशनमध्ये दहा कंत्राटदारांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागातून कामाच्या काढण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेमध्ये कंत्राटदाराने बनावट डीडी आणि एफडी सादर करीत काम केले. त्यानंतर करारनामा केल्यानंतर सुरक्षा अमानत रक्कम आणि परफॉर्मन्स अमानत रक्कम मुदतीपूर्वीच ती रक्कम काढली.
तसेच दोन कामाच्या कॉन्ट्रॅक्टसाठी एकच सुरक्षा अमानत रक्कम आणि परफॉर्मन्स अमानत रक्कम वापरली. याकरिता कार्यालयाची कुठलीही परवानगी घेण्यात आली नाही. याप्रकरणी 1 कोटी 23 लाख 89 फसवणुकीचा गुन्हा सदर पोलीस स्टेशनमध्ये 10 कंत्राटदारांविरुद्ध दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, 5 मार्च 2019 ते 16 जानेवारी 2022 यादरम्यान, आरोपी संजय लक्ष्मणराव बक्से (काटोल), संजय मारोतराव बडोदेकर ( नरखेड), महेंद्र पांडुरंग चिचघरे ( सूर्यनगर), विकेश धर्मदा हजारे (रमणा मारोती ), संजय शीतलाप्रसाद पांडे ( मानेवाडा), नीलेश सुरेशराव हिंगे रमणा मारोती), ओमप्रकाश महादेवराव बरडे (लोहारी सावंगा, नरखेड), महेश हरिदास गादेवार ( जुनी मंगळवारी), रमेश केमुरी ( हिवरीनगर), संदीप अरुणकुमार अवचट ( इतवारी) यांनी संगनमत करून लघुसिंचन विभाग, जिल्हा परिषद येथील विकासकामाच्या निविदा मंजूर झाल्यानंतर कॉन्ट्रॅक्ट मिळवले. त्यानंतर त्यांनी करारनामा करून त्याकरिता सुरक्षा अमानत रक्कम आणि परफॉर्मन्स अमानत रक्कम व कामाचा दोष निवारण कालावधी पूर्ण झालेला नसताना दोन कामाच्या कॉन्ट्रॅक्टसाठी एकच सुरक्षा अमानत रक्कम आणि परफॉर्मन्स अमानत रक्कम वापरली.
याकरिता त्यांनी कार्यालयाची कोणतीही परवागी घेतलेली नव्हती. यातील आरोपी रमेश केमुरी आणि संदीप अवचट यांनी मौजा धामणगाव व मौजा कामठी येथील काम मिळवण्याकरिता स्वत:च्या फायद्याकरिता सुरक्षा अमानत रक्कम आणि परफॉर्मन्स अमानत रकमेचा बनावट 'डीडी' आणि 'एफडी' सादर करून निविदा प्रक्रियेद्वारे सदरचे काम मिळविले.
या प्रकरणी आरोपींनी जिल्हा परिषदेसह शासनाची एकूण 1 कोटी 23 लाख 89 हजार 300रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून सदर पोलिसांनी आरोपींविरुद्ध कलम 420,467 ,468 , 471, 34 भादंवि अन्वये सदर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आले आहे.