पुणे : पन्हाळगडावर नुकताच मर्दानी खेळांचा दैदिप्यमान नजराणा पाहायला मिळाला. औचित्य होते ते एनसीसी अर्थात 'नॅशनल कॅडेट्स कॉर्पस्'च्या ६९ व्या वर्धापन दिनाचे.
१९९५च्या 'महाराष्ट्र आरडी परेड टीम'ने पन्हाळगडावर विविध उपक्रम साजरे केले. यामध्ये वृक्षारोपण, रक्तदान, मर्दानी खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम यांचा समावेश होता. पन्हाळ गड परिसरातील नागरिकही कॅडेट्सच्या या विविध उपक्रमांमध्ये सहभागी झाले होते.
महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेले हे कडेट्स पन्हाळगडावर एकत्र आले होते. ही मंडळी सध्या विविध क्षेत्रांत आघाडीवर आहेत.
'एनसीसीमुळेच आम्ही घडलो आणि आयुष्यात उत्तम प्रगती करू शकलो', अशा भावना यावेळी अनेक कडेट्सनी व्यक्त केल्या.
१९९५च्या २६ जानेवारीला राजपथावर संचलन केलेले आणि विविध स्पर्धांमध्ये महाराष्ट्राला देशपातळीवर नाव मिळवून दिलेले हे कडेट्स दरवर्षी रियुनियनच्या माध्यमातून एकत्र येत विविध सामाजिक उपक्रम राबवितात.
छत्रपती शाहूमहाराज आणि युवराज खासदार संभाजीराजे यांनीही या कडेट्सना राजवाड्यात आमंत्रित केले. तब्बल २२ वर्षांनंतरही एकत्रित येऊन सामाजिक उत्तरदायित्वाची भावना जपत असल्याबद्दल त्यांनी या सर्वांचे कौतुक केले.