मुंबई : अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप झाल्यानंतर त्यांनी आज आपल्या गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. आज शरद पवार आणि अजित पवार यांच्यासोबत चर्चेनंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा सोपवला. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर उच्च न्यायालयाने एका याचिकेवर सुनावणी करताना या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.
अनिल देशमुख यांच्यावर आरोप झाल्यानंतर महाविकासआघाडी सरकार अडचणीत आलं होतं. महाविकासआघाडी सरकारवर विरोधकांनी जोरदार टीका केली. पण अनिल देशमुख यांचा राजीनामा सरकारने घेतला नव्हता. पण आज अखेर न्यायालयाने सीबीआय चौकशीचे आदेश दिल्यानंतर अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे महाविकासआघाडी सरकार पुन्हा एकदा बॅकफूटवर गेली आहे.
अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्याआधी माजी वनमंत्री संजय राठोड यांना देखील राजीनामा द्यावा लागला होता. संजय राठोड यांच्यावर देखील गंभीर आरोप झाले होते.
पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात (Pooja Chavan Death Case) दबाव वाढल्यानंतर संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी राजीनामा दिला होता. विरोधकांनी हे प्रकरण चांगलंच लावून धरलं होतं.
दीड वर्षात महाविकासआघाडी सरकारमधील आधी शिवसेनेचे संजय राठोड आणि आता राष्ट्रवादीचे अनिल देशमुख अशा 2 मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला आहे.