विष्णू बुरगे, झी मीडिया, बीड : बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस झाला. त्यामुळे गाव खेड्या कडे जाणारे रस्ते आणि रस्त्यावरील पूल वाहून गेले आहेत. रस्त्यांची अवस्था बिकट झालेली आहे. परिणामी गावातील लोकांना येण्या-जाण्यासाठी आणि आरोग्य सेवा मिळण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे.
गेवराई तालुक्यातील चकलांबा पासून चार किलोमीटर अंतरावर चोरपुरी हे डोंगरदऱ्यात वसलेलं गाव आहे. या गावात जाण्यासाठी रस्ता नाही पावसाळ्यात या रस्त्याची दयनीय अवस्था असते.
या गावातील आशाबाई उमाजी गंडे या अपंग महिलेला दुपारी छातीत दुखून अत्यवस्थ वाटू लागल्याने त्यांना रुग्णालयात गाडीने रुग्णालयात नेलं जात होतं. पण रस्त्यावर झालेल्या चिखलात गाडी फसली. आशाबाई यांना रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी दुसरा कुठलाच पर्याय उपलब्ध नव्हता. त्यामुळे वेळेवर उपचार मिळू न शकल्याने आशाबाई यांचा गाडीतच मृत्यू झाला.
आशादेवी यांचा मृतदेह पुन्हा गावात नेण्यात आला आणि तिथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. विकासाच्या गप्पा मारणारे निवडणुका जवळ आल्या की आश्वासनांची खैरात करणाऱ्या पुढाऱ्यान विरोधात नागरिकांतुन संताप व्यक्त होत आहे.
बीड जिल्ह्यामध्ये मागील काही वर्षांच्या तुलनेत यावर्षी चांगला पाऊस झाला आहे असं असलं तरी अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. गावखेड्यात जाणारे रस्ते चिखलाने माखलेले आहेत. प्रशासनाकडून कुठलंही ठोस पाऊल उचललं जात नाही. त्याचा फटका गावातील नागरिकांना सहन करावा लागतोय उपचारच मिळत नसल्याने आणि गावापासून शहरापर्यंत येण्यासाठी सोय होत नसल्यामुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे.
दरम्यान वेळेत प्राथमिक उपचार मिळाले असते तर आपल्या बहिणीचा जीव वाचला असता, पण रस्त्यांची दुरवस्था झाल्यामुळे माझ्या बहिणीचा मृत्यू झाला असल्याची खंत मृत महिलेच्या भावाने व्यक्त केली.