सांगली: सुप्रसिद्ध मराठी अभिनेता वैभव मांगले यांना शुक्रवारी नाटकाच्या प्रयोगादरम्यान स्टेजवरच भोवळ आल्याचा प्रकार घडला. सांगलीच्या भावे नाट्यगृहात वैभव मांगले यांच्या 'अलबत्या गलबत्या' नाटकाचा प्रयोग सुरु होता. यावेळी रंगमंचावर असतानाच मांगले यांना अचानक भोवळ आली आणि ते स्टेजच्या बाजूला कोसळले. यानंतर वैभव मांगले यांना तातडीने नजीकच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी डिहायड्रेशनमुळे (शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्याने) भोवळ आल्याचे डॉक्टरांनी सांगितले. यामुळे अलबत्या गलबत्या नाटकाचा प्रयोगही रद्द करण्यात आला.
मात्र, या प्रकारानंतर सोशल मीडियावर वैभव मांगले यांना हदयविकाराचा झटका आल्याचे संदेश फिरायला सुरुवात झाली होती. मात्र, ही अफवा असल्याचे अभिनेते आणि दिग्दर्शक चिन्मय मांडलेकर यांनी स्पष्ट केले. 'अलबत्या गलबत्या' नाटकात वैभव मांगले यांची बरीच मोठी भूमिका आहे. हे नाटक कलाकाराला थकवणारे आहे. त्यामुळे वैभव यांना चक्कर आली असावी, असे मांडलेकर यांनी सांगितले. दरम्यान, सध्या वैभव मांगले यांच्यावर रुग्णालयातच उपचार सुरु असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे.