राष्ट्रवादीची खेळी, एकाचवेळी काँग्रेस, शिवसेनेला धक्का देण्याचा इरादा

राष्ट्रवादी काँग्रेसने कोकणातील आपली पकड मजबुत करण्यासाठी नवी खेळी केली आहे.  

Updated: Nov 21, 2018, 07:04 PM IST
राष्ट्रवादीची खेळी, एकाचवेळी काँग्रेस, शिवसेनेला धक्का देण्याचा इरादा title=

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसने कोकणातील आपली पकड मजबुत करण्यासाठी नवी खेळी केली आहे. त्यामुळे महाआघाडीत बिघाडी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये राष्ट्रवादीचे आमदार होते. मात्र, दोन्ही आमदार हे शिवसेनेत दाखल झालेत. त्यामुळे राष्ट्रवादीची या दोन ठिकाणची ताकद कमी झाली. त्यामुळे राष्ट्रवादीने माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना महाआघाडीत घेण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. दरम्यान, राणे हे भाजपच्या कोट्यातून खासदार झाले आहेत. त्यामुळे राणे आता कोणती भूमिका घेणार याची उत्सुकता आहे. तर भाजप या ठिकाणी कोणता निर्णय घेणार याचीही उत्सुकता आहे.

'कोकणचे सुपुत्र' महाआघाडीत परतणार असल्याची माहिती सध्या पुढे येत आहे. या कोकणातल्या या बड्या नेत्यानं राष्ट्रवादीशी सलगी गेल्या काही दिवसात वाढलीय. काही दिवसांपूर्वीच काँग्रेस सोडलेल्या नेत्याला महाआघाडीत येण्याचे प्रयत्न सुरू आहेत. महाआघाडीच्या चर्चेत राष्ट्रवादीनं रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मतदारसंघात तगडा उमेदवार असल्याचं सांगत या जागेवर दावा ठोकलाय. त्यामुळे नुकतीच काँग्रेसच्या लोकसभा मतदारसंघाच्या आढावा बैठकीत यामुद्द्यावर चर्चा झाली असून काँग्रेस सोडून गेलेल्या या नेत्याच्या राष्ट्रवादीशी वाढलेल्या सलगीमुळे काँग्रेसमध्ये अस्वस्थता आहे.

दरम्यान, राणे जर महाआघाडीत सहभागी झाले तर कोकणात भाजपला आपले अस्तित्व दाखविण्याची नामी संधी मिळणार नाही. त्यामुळे भाजप राणेंना महाआघाडीत जाण्यापासून रोखण्याचा आटोकाट प्रयत्न करेल, यात शंका नाही. मात्र, राष्ट्रवादीचे खेळी यशस्वी झाली तर काँग्रेस आणि शिवसेनेला हे त्रासदायक ठरणार आहे आणि राष्ट्रवादीला याचा मोठा फायदा होऊ शकतो. राणे आणि राष्ट्रवादीत जी सलगी वाढत आहे. त्यावरुन अंदाज व्यक्त होत आहे की, राणे महाआघाडीत दाखल होतील.