विशाल करोळे, औरंगाबाद : औरंगाबादची मेडिकलची विद्यार्थिनी आकांक्षा देशमुख हिच्या खुमाचं गूढ वाढत चाललं आहे. पाच दिवस उलटले तरी पोलिसांच्या हाती काहीच लागलं नाही. आकांक्षाच्या खुनामुळे एमजीएम कॉलेजचं संपूर्ण वातावरण ढवळून निघालं आहे. आकांक्षा देशमुख या मेडिकलच्या विद्यार्थिनीच्या खूनाला 5 दिवस उलटले तरी अजूनही पोलीस निष्कर्षापर्यंत पोहोचू शकले नाहीत. 12 डिसेंबरला आकांक्षाचा खून झाल्याचं समोर आलं होतं. हॉस्टेलमध्ये काही पत्रं सापडल्यानं ही आत्महत्या असावी असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज होता. मात्र त्यानंतर ती पत्रं आकांक्षाची नसल्याचं तपासात पुढं आलं आणि गूढ वाढतच गेलं.
मुलींच्या वसतीगृहात परवानगीशिवाय कुणीही जावू शकत नाही, मग आकांक्षाचा खून झाला कसा हा महत्त्वाचा प्रश्न आहे.
महिला वस्तीगृहाच्या बाजूला बांधकाम सुरु आहे. त्याठिकाणाहून या वसतिगृहात शिरता येतं, तिथून कुणी आलं आणि खून केला असावा किंवा हॉस्टेलमध्येच काही वाद झाला त्यातून आकांक्षाचा खून झाला का, अशा सगळ्या शक्यता पोलीस तपासून पाहत आहेत. आकांक्षाच्या खुनाच्या तपासासाठी पोलिसांनी चार पथकं तयार केली आहेत. मात्र ठोस काहीच हाती लागलेलं नाही.
धक्कादायक म्हणजे महिला वस्तीगृहात खून झाल्यानं अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. 400 विद्यार्थिनींचं वसतिगृह असतांना कुणालाच सुगावा कसा लागला नाही. एखादा माणूस मुलींच्या वसतिगृहात जाऊन खून करुन पसार कसा होऊ शकतो, हे न उलगडणारं कोडं आहे.
पोलिसांनी वस्तीगृहातील मुलींचीही चौकशी केली आहे. तर वस्तीगृहाच्या बाजूला सुरु असलेल्या बांधकामवरील मजूरांचीही चौकशी करण्यात आली. यात एक मजूर खून झाला त्या तारखेपासून बेपत्ता असल्याचं समोर आलं आहे. त्या दिशेनं आता पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
आकांक्षाच्या खुनाचा उलगडा न झाल्यानं संपूर्ण एमजीएम कँम्पसमध्येच भितीचं वातावरण आहे. जवळपास 200 च्या वर मुलींनी वस्तीगृह सोडलं आहे. त्यामुळे औरंगाबादच्या शिक्षण क्षेत्रातील ही भीती घालवण्यासाठी पोलिसांनीही चोख आणि वेगानं तपास करून आरोपीला गजाआड कऱण्याची गरज आहे.