धनंजय मुंडे यांना पक्षाचा पहिला मोठा धक्का; बीडमध्ये कारवाई करत...

Beed News : राज्यातील मंत्रीमंडळात मंत्रीपदी असणाऱ्या धनंजय मुंडे यांना राष्ट्रवादी अजित पवार पक्षानं पहिला धक्का दिला आहे. सध्या राजकीय वर्तुळात याचीच चर्चा...   

Updated: Jan 15, 2025, 10:39 AM IST
धनंजय मुंडे यांना पक्षाचा पहिला मोठा धक्का; बीडमध्ये कारवाई करत...  title=
beed news amid Santosh Deshmukh Murder Case dhananjay munde beed district comittee disloved ajit pawar ncp in action mode

सीमा आढे, झी मीडिया, मुंबई : (Beed News) बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी तपास यंत्रणांच्या कारवाईला वेग आला सून, आता सत्ताधाऱ्यांनीसुद्धा कारवाईत जातीनं लक्ष घालण्यास सुरुवात केली आहे. याच कारवाईचा एक भाग म्हणून बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी अजित पवार पक्षाची संपूर्ण कार्यकारणी बरखास्त करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांनी यासंदर्भातील माहिती दिली. 

पक्षाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या सूचनेनुसार मंगळवारी रात्रीपासून सर्व कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली. इथून पुढे जिल्हा पदाधिकारी निवडताना चारित्र्य पडताळणी केली जाणार असल्याची माहितीसुद्धा यादरम्यान समोर आली असून, गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या पदाधिकाऱ्यांना पक्षात प्रवेश दिला जाणार नाही असं स्पष्ट करण्यात आलं आहे. 

राष्ट्रवादी अजित पवार गटाची बीड जिल्हा कार्यकारणी बरखास्त झाल्यानं मंत्री धनंजय मुंडे यांना पक्षाने हा पहिला मोठा धक्का दिल्याचं सांगितलं जात आहे. मंगळवारीच बीड जिल्ह्यातील पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची बैठक राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली. या बैठकीत त्यांनी बीड जिल्हा कार्यकारिणी बरखास्तीचा निर्णय घेतला.

अजित पवार यांची बिड जिल्ह्याचे पक्षाचे अध्यक्ष राजेश्वर चव्हाण, माजी आमदार संजय दौंड आणि इतर प्रमुख पदाधिकारी यांच्यासोबत बैठक पार पडली. दरम्यान, नव्याने नियुक्त करताना चारित्र्य पडताळणी करण्याच्या प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरेंनी दिल्या असून, सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांचे नाव समोर आल्यानंतर पक्षाने कार्यकारिणी बरखास्त करण्याचा निर्णय घेतला. 

हेसुद्धा वाचा : बीडचं पालकमंत्रीपद घेणार का? अजित पवारांनी अखेर सांगून टाकलं, म्हणाले '19 जानेवारीला...'

 

लवकरच बीड जिल्हा कार्यकारिणीसाठी नव्यानं नियुक्ती करण्यात येणार आहे. तत्पूर्वी मंगळवारी सायंकाळी मंत्री धनंजय मुंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्यानंतर मुंडे तातडीने परळीकडे रवाना झाल्याचं म्हटलं गेलं.

वाल्मिकचा ताबा SIT कडे 

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी वाल्मिक कराडचा ताबा आता SITनं घेतला आहे. बीड पोलिसांकडून SITनं वाल्मिकचा ताबा घेतला असून, बुधवारी SIT वाल्मिकला घेऊन केज कोर्टाकडे रवाना झाली. जिथं, मकोका प्रकरणी केज कोर्टात सुनावणी होणार आहे.