विष्णू बुरगे, झी मीडिया, बीड : शेतकऱ्यांसाठी योजना राबवताना प्रशासनाचे दुर्लक्ष झालं तर मिळणारा फायदा शेतकऱ्यांना मिळत नाही. योजनेवर करोडो रुपये खर्च होतात पण त्याचा लाभ शेतकर्यांना खरंच शेवटपर्यंत मिळतो का ? असा प्रश्न उपस्थित होतो. बागायती शेतकऱ्यांवर कोरडवाहू शेती करण्याची वेळ आली हे आम्ही जाणून घेतलंय.
बावीस वर्षांपूर्वी या गावांमध्ये पाझर तलाव झाला आणि याचा फायदा तीनशेहून अधिक शेतकऱ्यांना होऊ लागला. गावात पाणी मिळाल्यानं बागायती शेती करायला सर्व शेतकऱ्यांनी सुरुवात केली. मात्र दहा वर्षापूर्वी पाझर तलावाचा बांध फुटला आणि होत्याच नव्हतं झाल. अनेक वेळा प्रशासनाला विनंत्या करूनही तो बांध दुरुस्त केला नाही.
परिणामी अंबेजोगाई तालुक्यातील लोखंडी येथील तीनशेहून अधिक शेतकऱ्यांना पाझर तलावामुळे होत असलेला फायदा सध्या होत नाहीत. यावर्षी चांगला पाऊस झाला मात्र पाझर तलावाचा बांध फुटल्यामुळे सर्व पाणी वाहून गेले. शेजारी धरण असूनही कोरडवाहू शेती करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आलीय.
त्यामुळे या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी बांध दुरुस्त करण्याची मागणी केलीय. बांध दुरुस्त झाला तर पुढच्या वर्षी तरी किमान या भागातील शेतकऱ्यांना फायदा होईल असा विश्वास ते व्यक्त करत आहेत.
किमान आतातरी प्रशासनानं या वर्षी तरी पाझर तलावाची दुरुस्त केला तर पुढच्या वर्षी या ठिकाणी पाणी अडून राहिल. याचा फायदा नक्कीच या ठिकाणच्या शेतकऱ्यांना होईल. त्यामुळे प्रशासनाने तत्परता दाखवून या ठिकाणच काम पूर्ण पाहीजे असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.