गोंदिया : भंडारा-गोंदिया मतदार संघातील पोटनिवडणुकीत तुमसर तालुक्यातील ११मतदान यंत्रं जवळपास दीड तास बंद पडली होती. त्यामुळे शेकडो मतदारांना ताटकळत थांबवं लागलं. तंत्रज्ञांना बोलावून काही वेळापूर्वीच मतदान यंत्र सुरू करण्यात आली असून, सर्व ठिकाणी मतदान सुरु झाल्याचं मतदान अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. मोरगाव अर्जुनी तालुक्यातल्या नवेगावमधली केंद्र क्रमांक १८३मध्ये यंत्र बंद पडल्यानं प्रक्रिया बंद प़़डली होती.
भंडारा गोंदिया जिल्ह्यात लोकसभा पोटनिवडणूक पार पडत असून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. सकाळ पासूनच ग्रामीण भागात मतदानासाठी उत्सुकता दिसत आहे. एकूण १७ लाख ५९ हजार ९७७ मतदार असून ते आज आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. लोकसभा पोट निवडणूकीसाठी प्रथमच व्हिव्हिपॅट वापरण्यात येत आहेत. निवडणुकीत एकूण १८ उमेदवार रिंगणात आहेत.
मुख्य लढत भाजप, काँगेस व राष्ट्रवादी काँगेस मध्ये आहे , भाजप कडून हेमंत पटले याना उमेदवारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँगेसचे मधुकर कुकडे यांना तिकीट देण्यात आलंय. निवडणुकीत भल्याभल्यांची प्रतिष्ठा पणाला लागली असून भाजप करिता अस्तित्वाची तर काँगेस व राष्ट्रवादी काँगेस करिता प्रतिष्ठेची लढाई आहे.