Bhiwandi Lok Sabha : महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीसाठी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आणखी दोन उमेदवारांची घोषणा केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाने उमेदवारांची दुसरी यादी गुरुवारी जाहीर केली. या यादीत भिवंडी मतदारसंघातून सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटपामध्ये काँग्रेसने भिवंडी मतदारसंघावर दावा केला होता. मात्र शरद पवारांनी भिवंडीत उमेदवार दिल्याने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे आता काँग्रेसमध्ये बंडखोरी होण्याची शक्यता आहे.
शरद पवार गटाने भिवंडीसह बीड जिल्ह्यातून बजरंग सोनावणे यांनाही उमेदवारी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसने (शरदचंद्र पवार) पहिल्या यादीत पाच उमेदवारांची नावे जाहीर केली. त्यामुळे शरद पवार गटाच्या उमेदवारांची एकूण संख्या सात झाली आहे. दुसरीकडे वरिष्ठांच्या आदेशानुसार, मैत्रीपूर्ण लढत देणार अथवा कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर भिवंडी लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी लढणार असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष दयानंद चोरघे यांनी दिली आहे. शरद पवार गटाने सुरेश म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर चोरघे यांनी भिवंडीत पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली.
वरिष्ठांना विश्वासात न घेता उमेदवारी जाहीर - दयानंद चोरघे
"ज्याप्रमाणे सांगलीत वरिष्ठांना विश्वासात न घेता उमेदवारी जाहीर केली आहे. त्याचप्रमाणे भिवंडी लोकसभेमध्ये देखील वरिष्ठ नेत्यांना विश्वासात न घेता उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे या ठिकाणी जर मैत्रीपूर्ण लढत लढवायची असेल, तर मी मैत्रीपूर्ण लढत लढायला तयार आहे. तसेच, दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये संगनमत झालं तरी मी कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर अपक्ष निवडणूक लढवण्यास देखील तयार आहे," अशी प्रतिक्रिया दयानंद चोरघे यांनी दिली.
10 जागा लढवणार शरद पवारांचा पक्ष
दरम्यान, महाविकास आघाडीचा भाग असलेल्या शिवसेनेने आतापर्यंत 21 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने (शरदचंद्र पवार) एकूण सात उमेदवार जाहीर केले आहेत. महाराष्ट्रात शरद पवारांचा पक्ष एकूण 10 जागा लढवणार आहे. त्यामुळे अजून तीन जागांवर उमेदवार घोषित व्हायचे आहेत. ज्या जागांसाठी उमेदवार जाहीर होणे बाकी आहेत त्यामध्ये माढा, सातारा आणि रावेर लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे.