Resident Doctor Strike : निवासी डॉक्टरांनी पुन्हा एकदा राज्यव्यापी संपाची हाक दिली आहे. प्रलंबित मागण्या पूर्ण होत नाही म्हणून डॉक्टरांनी संप पुकारला आहे. निवासी डॉक्टरांचा संप मोडून काढण्यासाठी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी बैठक घेतली होती. पण ही बैठक निष्फळ ठरल्यामुळे निवासी डॉक्टर संपावर जाण्याबाबत ठाम आहेत. बुधवारी संध्याकाळी 5 वाजल्यापासून निवासी डॉक्टर संपावर जाणार आहेत. मात्र आपत्कालीन सेवा संपादरम्यानही सुरु राहणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. (Big news resident doctors in the state are on strike from february 7)
निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेकडून एक पत्रक जारी करण्यात आले आहे. या पत्रकात ते म्हणाले आहे की, गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील निवासी डॉक्टरांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. गेल्या एक वर्षभरात मध्यवर्ती मार्ड संघटनेने अनेकवेळा यासाठी सरकारकडे पाठपुरवठाही केला. पण प्रत्येकवेळी प्रशासनाकडून आश्वासनांचे गाजर हे देण्यात आले. प्रत्यक्षात कोणतीही दखल याबद्दल घेण्यात आलेली नाही. त्यामुळे विविध प्रलंबित मागण्यासाठी मध्यवर्ती मार्ड संघटनेने 7 फेब्रुवारीला संध्याकाळी पाच वाजेपासून संपावर जाणार असल्याचं निश्चित केल आहे. त्याच वेळी संपापूर्वीच होणाऱ्या रुग्णसेवेवरील परिणामासाठी त्यांनी या पत्रकाद्वारे माफी मागितली आहे. सोबतच संपाच्या काळात सर्व अत्यावश्यक सेवा चालू राहणार असल्याचं मार्डच्या वतीने सांगण्यात आलंय.
निवासी डॉक्टरांना दिले जाणारे त्यांचे हक्काचे विद्यावेतन हे त्यांना कधीही वेळेवर देण्यात येत नसल्याचंही त्यांनी या पत्रकात नमूद केलं आहे. अनेक महिन्यांसाठी विद्यावेतन थकीत असल्यामुळे, निवासी डॉक्टरांच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन होत असल्याचं त्यांनी सांगितल आहे. निवासी डॉक्टरांसाठी पुरेशा प्रमाणात हॉस्टेल्स नाहीत. त्यामुळे दोन-तीन डॉक्टरांना एकच खोलीत अत्यंत अडचणीत राहण्याची वेळ ओढावली आहे. वेळोवेळी प्रशासनाला या समस्यांबद्दल दाद मागितली आहे. पण फक्त तोंडी आश्वासन दिलं जातं म्हणून अखेर निराश होऊन आम्हाला संपावर जावं लागत आहे, असं त्यांनी सांगितलं.
निवासी डॉक्टरांना दिले जाणारे विद्यावेतन हे प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेपर्यंत त्यांच्या खात्यावर जमा केलं जावं.
निवासी डॉक्टरांना दिले जाणारे विद्यावेतन ही केंद्रीय संस्थांमध्ये दिल्या जाणाऱ्या विद्यावेतनाप्रमाणे असावं.
निवासी डॉक्टरांसाठी पुरेशा प्रमाणात हॉस्टेलची व्यवस्था करावी.