Suresh Dhas on Santosh Deshmukh Murder: संतोष देशमुखला सलग 4 तास मारहाण करण्यात आली. यादरम्यान तो सतत याचना, विनंती करत होता. मी तुमचं नाव कोणाला सांगणार नाही, मला मारु नका असं तो सांगत होता. मला फक्त पाणी पाजा असंही म्हणत होता. पण यांनी त्याला पाण्याऐवजी दुसरं काहीतरी पाजलं, ज्याचा मी उल्लेखही करु शकत नाही असा खुलासा भाजपा आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी केला आहे. धाराशीवमधील आक्रोश मोर्च्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा आकाचा उल्लेख करत त्यांची कोठडीत रवानगी करण्याची मागणी केली.
"धायमोकलून रडत होता तो माणूस, त्याचे व्हिडीओ काढून दुसऱ्याला दाखवले जात होते. बघा आम्ही कसं मारत आहोत सांगत होते. समोरुन आका फार चांगलं मारत आहात, अजून मारा असं सांगत होता," असंही सुरेश धस म्हणाले.
"तुम्ही आमच्या संतोषला 100 तोंडात मारुन माघारी पाठवायचं ना. यातील घुले नावाचा आरोपी म्हणाला होता, संतोषने माझ्या दोन तोंडात मारल्या आहेत, त्याच्या अगोदर संतोषच्या तोंडात मारली असती. याचे कपडे काढून, हिंडवेन असं म्हटलं होतं. तुम्ही कपडे काढून धिंड काढायला हवी होती, पण अशा प्रकारे मारायला नको होतं. आम्ही धिंड काढलेली मान्यही केलं असतं. पण तुमच्या मनगटात जोर आला आहे, पैसा जास्त झाला आहे, तुम्हाला पैसाचा माज आला आहे. आम्ही तुमचा माज पाहिला असता आणि शांतपणे सहन केला असता. पण तुम्ही आमच्या संतोषला अशा पद्धतीने मारलं," असा संताप सुरेश धस यांनी व्यक्त केला आहे.
पुढे ते म्हणाले, "सोमनाथच्या बाबतीतही तेच घडलं आहे. एका अधिकाऱ्याला निलंबित केलं आहे. पण सोमनाथच्या कुटुंबाने सेवेतून काढून टाकण्याची मागणी केली आहे."
"संतोषचं हसू पाहा ना. हा चेहरा पाहिल्यावर हा गुंड वाटतो का? तुम्ही त्याला कशाकशाने मारलं. इतकं मारायला काय केलं होतं. फक्त खंडणीच्या आडवा आला होता आणि दलिताच्या पोराला मारलं म्हणून उभा राहिला होता. तो दलित समाजाचा पोरगा आहे, ज्याने शुक्रवारी फिर्याद दिली होती. फिर्याद घेऊ नका म्हणून ज्या माणसाचा फोन पोलीस स्टेशनला आला तो प्रमुक आरोपी झाला पाहिजे. हाच तो आका आहे. आकाचा आकाही बिनभाड्याच्या खोलीत गेला पाहिजे. यांना जरा गरम बराकीत जाऊ दे. बाहेर कितीही टूरटूर केली तरी, आत गेल्यावर कळतं. ही पिलावळ बाहेर ठेवण्याच्या लायकीची नाही," असंही ते म्हणाले आहेत.