मुंबई : शिवसेनाप्रमुख हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा महाराष्ट्रात एक आदरयुक्त दरारा होता. बाळासाहेबाचं दर्शन ही शिवसैनिकांसाठी एक आनंदाची पर्वणी असायची. कोणतीही सभा असो वा प्रचारसभा त्यांना पाहून एकच आरोळी उठायची.. कोण आला रे कोण आला.
राज्य विधिमंडळाचं अधिवेशन सुरु आहे. विरोधी पक्ष भाजप दररोज मंत्री नबाव मलिक यांच्या राजीनाम्यावरून विधानभवनाच्या पायऱ्यावर आंदोलन करत आहे. तर, सभागृहात कामकाजात सहभागी होऊन सरकारवर टीका करण्याची संधी सोडत नाहीत.
नवाब मिल्क यांच्या राजीनाम्यावरून भाजप आज राणीबाग ते आझाद मैदान असा मोर्चा आयोजित केला होता. पण, परीक्षांचा कालावधी असल्याचं कारण देत पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली. त्यामुळे भाजपचा हा मोर्चा केवळ आझाद मैदानापुरताच मर्यादित राहिला.
काल विधानसभेत विरोधी नेते देवेंद्र फडणवीस यांनी कायदा आणि सुव्यवस्था प्रश्नावरून मोठा गौप्यस्फोट केला. व्हिडीओ बॉम्ब टाकून त्यांनी विधानसभेत एकच गहजब केला. त्यातच मोर्चाला परवानगी नाकारण्यात आल्याने सरकार घाबरले असा आरोप भाजप आमदार करत होते.
आज सकाळी विधानभवनात नेहमीप्रमाणे भाजप आमदार नबाव मलिक यांच्या राजीनाम्यावरून आंदोलन करत होते. याचवेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे विधान भवनात आगमन झालं. त्यांना पाहून भाजप आमदार उभे राहिले आणि ती शिवसेनेची आरोळी उठली.. कोण आला रे कोण आला... महाराष्ट्राचा वाघ आला.
सकाळची वेळ. सभागृहात जाण्यासाठी आमदाराची लगबग सुरु झालेली अशातच ही ऐकल्याने काही शिवसेनेच्या आमदारांनी तेथे धाव घेतली. पण, कोण आला... हे फडणवीस यांच्यासाठी म्हटलं गेल्याचं पाहून त्यांनी तेथून काढता पाय घेतला.