Chagan Bhujbal Vs Manoj Jarange : छगन भुजबळ-मनोज जरांगे वाद दिवसेंदिवस चिघळत चालला आहे. लायकी नसलेल्या लोकांच्या हाताखाली काम करावं लागतं या मनोज जरांगेंच्या विधानावर भुजबळांनी हिंगोलीच्या सभेतून जोरदार प्रहार केला आहे. लायकी नसलेल्यांच्या हाताखाली काम करावं लागलं अशी टीका मनोज जरांगे यांनी केली. तर, 'बहुजन मावळ्यांची लायकी नव्हती का? असा सवाल छगन भुजबळ यांनी उपस्थित केलाय.
मनोज जरांगे आणि छगन भुजबळांमध्ये पुन्हा एकदा जुंपलीय. राज्यात नवीन वर्णव्यवस्था यायला लागली आहे.आता लायकी काढली जातेय असं विधान भुजबळांनी केले. मात्र, यावरुनच मनोज जरांगेंनी भुजबळांवर पलटवार केलाय. तुमच्या मनात विष आहे. महापुरुषांपेक्षा तुम्ही मोठे आहेत का? असा सवाल जरांगेंनी भुजबळांना केलाय.
भुजबळांच्या या विधानानंतर जरांगेंनी लायकी शब्द मागे घेतला
भुजबळांच्या या विधानानंतर जरांगेंनी लायकी शब्द मागे घेतला. विनाकारण जातीय रंग दिला जात असल्यामुळे शब्द मागे घेत असल्याचं जरांगेंनी म्हटले. जरांगेंनी शब्द मागे घेतला तरी भुजबळ काही थांबायला तयार नाहीत. आता राज्यात नवीन वर्णव्यवस्था यायला लागलीय असा घणाघात भुजबळांनी केलाय. या टीकेनंतर जरांगेंनी पुन्हा एकदा भुजबळांवर जोरदार हल्लाबोल केला.
अनेक दिवसांपासून मराठा आरक्षणावरुन मनोज जरांगे-पाटील आणि छगन भुजबळ यांच्या वाकयुद्ध रंगलंय. भुजबळ-जरांगे वाद चिघळत चाललाय. आरक्षणावरुन केल्या जाणा-या टीकेची जागा आता लायकी-वर्णव्यवस्थेसंबंधी टीकेनं घेतलीय. आरोपांचं स्वरुप राजकीय राहिलेलं नसून व्यक्तिगत पातळीवर आलंय. ही बाब महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आणि सामाजिक शांततेच्या दृष्टीनं नक्कीच चांगली नाही.
मराठ्यांसाठी ओबीसीतूनच आरक्षण घेणार असा पुनरूच्चार मनोज जरांगे यांनी केल्यामुळे सरकारीच डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. त्यात भुजबळांच्या भूमिकेला मुख्यमंत्र्यांनी पाठिंबा दिल्यामुळे नवा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे.
पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्याचा मनोज जरांगे पाटील यांनी खरपूस समाचार घेतलाय. काही लोक विषय भरकटवण्यासाठी काहीही कुठे बोलता अशी टीका जरांगेंनी केलीय. तसंच सर्वच पक्ष मराठाविरोधी असल्याचा मोठा आरोपही जरांगेनी केलाय
मनोज जरांगे पाटील यांनी लायकीबाबतचं विधान मागे घेतल्यानंतर विरोधी पक्षाकडून तसंच ओबीसी महासंघाकडूनही त्यांचं स्वागत करण्यात आलंय.. जरांगेंनी लायकी शब्द मागे घेतल्याबद्दल विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी धन्यवाद दिले आहेत. तर, ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनीही जरांगेंचं स्वागत केलंय.