'राज्यातील लॉकडाऊन उठवू, पण तुम्ही 'या' गोष्टीसाठी तयार आहात का?'

आपण कंटाळा घालवण्यासाठी लॉकडाऊन करत किंवा उघडत नाही

Updated: Jul 25, 2020, 11:27 AM IST
'राज्यातील लॉकडाऊन उठवू, पण तुम्ही 'या' गोष्टीसाठी तयार आहात का?' title=

मुंबई: राज्यातील लॉकडाऊन घाईघाईने उठवला तर कोरोनाची साथ प्रचंड वाढू शकते, अशी भीती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. ते शनिवारी दैनिक 'सामना'ला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. लॉकडाऊमुळे राज्यातील अनेक व्यवहार तब्बल चार महिन्यांपासून ठप्प आहेत. या सगळ्याला नागरिक आता कंटाळले आहेत. त्यामुळे राज्यातील लॉकडाऊन पूर्णपणे केव्हा उठवणार, असा प्रश्न लोकांकडून विचारला जात आहे. 

मुख्यमंत्री मातोश्रीच्या बाहेर पडतच नाहीत; विरोधकांच्या आरोपांना उद्धव ठाकरेंचे प्रत्युत्तर

लोकांच्या या प्रश्नाला उद्धव ठाकरे यांनी 'सामना'च्या मुलाखतीमधून सविस्तरपणे उत्तर दिले. त्यांनी म्हटले की, आपण सध्या एक एक गोष्ट सोडवत चाललो आहोत. लॉकडाऊन किंवा अनलॉक या गोष्टीत अडकून पडण्यात अर्थ नाही. देशात घाईघाईने लॉकडाऊन करण्यात आला, ती गोष्ट चूक होती. त्याचप्रमाणे आता घाईघाईने लॉकडाऊन उठवला तर तेही चूकच ठरेल. आपण कंटाळा घालवण्यासाठी लॉकडाऊन करत किंवा उघडत नाही, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले. 
 

लॉकडाऊनमुळे अनेकांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र, त्यामुळे सर्वकाही घिसडाईने उघडले आणि साथ प्रचंड वाढली आणि जीवच गेला तर पोटापाण्याचं काय करणार? कारखान्यांमध्ये ही साथ घुसली तर काय होणार? अमेरिकेत कोरोनाचा मोठ्याप्रमाणावर प्रादुर्भाव होऊनही लॉकडाऊन नाही. लॉकडाऊन गेला खड्ड्यात, जीव गेला तरी बेहत्तर, पण आम्हाला लॉकडाऊन नको, हे धोरण राबवायला महाराष्ट्रातील जनता तयार आहे का?, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला. 

अमेरिकेची तशी तयारी असेल. पण माझी तयारी नाही. मी डोळ्यांसमोर माझ्या माणसांना तडफडताना पाहू शकत नाही. मी म्हणजे ट्रम्प नव्हे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. मुंबईतील रेल्वे सुरु करावी अशी मागणी केली जाते. मात्र, घाईगडबडीने निर्णय घेतलेला तुम्हाला चालेल का? कुटुंबं मृत्यमुखी पडल्यावर घराला जे टाळं लागेल ते लॉकडाऊन कोण उघडणार? या गोष्टी टाळण्यासाठीच लॉकडाऊन गरजेचा आहे, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.