नाशिक : शाळेत जाणाऱ्या एका मुलाला अचानक धावत आलेल्या गायींनी थेट शिंगावरच घेतले. गायींचा घोळका आला. त्यावेळी हा मुलगा शाळेत जात होता. गायींचा हा हल्ला एवढा भयानक होता की तो मुलगा थेट बेशुद्धच पडला. नाशिकच्या सिडको भागात मोकाट जनावरांचा उपद्रव वाढला आहे. सकाळी महेश शाळेत जात असताना अचानक गायींचा कळप महेशच्या अंगावर आला. त्या गायींनी महेशला चक्क शिंगावर घेतले. गायींच्या हल्ल्यात महेश गंभीर जखमी झाला. त्याच्या डोक्याला, छातीत आणि पोटात मार बसला आहे. दरम्यान, तेथे उपस्थित असलेले प्रकाश कुमावत यांनी गायींच्या कळपातून महेशची सुटका केली. मात्र, गायींच्या हल्ल्यात महेश जखमी झाल्याने तो बेशुद्ध पडला.
नाशिकच्या सिडको परिसरात 25 ते 30 मोकाट जनावरांचा ठिय्या असतो. महापलिकेने यांचा बंदोबस्त करावा म्हणून नागरिकांनी ऑनलाइन तक्रारी केल्या, पण त्या कोणीही गांभीर्याने या तक्रारींची दखल घेतली नाही. त्यामुळे आज शाळेच्या मुलावर ही वेळ आली, अशी प्रतिक्रिया प्रत्यक्षदर्शी संगीता नेर हरिष महाजन यांनी दिली.
या आधीही इंदिरानगर परिसरात एका वृद्ध महिलेवर मोकाट जनावरांनी हल्ला केला होता. त्याहीवेळी महापालिकेकडून या जनावरांच्या बंदोबस्ताचे आश्वासन देण्यात आले होते. मोकाट जनावरांचा प्रश्न मार्गी लागावा म्हणून महापालिकेकडून कंत्राट दिले जाते. मात्र, कंत्राटदार चोख काम करत नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. आता तरी महापालिका जागी होणार का, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.