शिर्डी : सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागतासाठी शिर्डी नगरी सज्ज झाली आहे. समाधी मंदिरांसह परिसराला मोठी सजावट करण्यात आली आहे. रंगीबेरंगी फुलांनी आरास करण्यात आली आहे. यंदाच्या वर्षीही ३१ डिसेंबरला साई मंदिर खुल ठेवण्याचा निर्णय देवस्थान प्रशासनाने घेतला आहे. नवीन वर्षाच्या निमित्ताने दरवर्षी लाखो भाविक शिर्डीत साईंच्या दर्शनासाठी येतात. गेल्या अनेक दिवसांपासून शिर्डीत भाविकांची गर्दी पाहायला मिळत आहे. नाताळाच्या सुट्टीत साईभक्तांनी साईंच्या दर्शनसाठी मोठी गर्दी केली आहे.
२७ डिसेंबर ते ३० डिसेंबर या चार दिवसात ३ लाखापेक्षा अधिक भाविकांनी साईंचं दर्शन घेतलं आहे. चार दिवसात भक्तांनी २ कोटी ६५ लाख ६० हजार ९३३ रुपयांचं दान साईंच्या चरणी अर्पण केलं आहे. तर ३३०.४०० ग्रॅम सोनं आणि ३९८९.००० ग्रॅम सोनं ही साईंच्या चरणी भाविकांनी दान केलं आहे. एकूण २ कोटी ७८ लाख ८१ हजार ४८१ रुपयांचं दान साई भक्तांनी केलं आहे.
दरवर्षी नाताळची सुट्टी आणि नवीन वर्षाच्या निमित्ताने साईंच्या दर्शनासाठी शिर्डीत देशविदेशातून भाविक येत असतात. साईंचे भक्त फक्त भारतातच नाही तर विदेशातही आहेत.