Breast Cancer | भारतीय कंपनीचं अभिमानास्पद संशोधन, ब्रेस्ट कॅन्सरचं होणार लवकर निदान

स्तनांच्या कर्करोगाचं ( Breast Cancer) प्राथमिक अवस्थेतच निदान होऊ शकेल, अशी रक्तचाचणी भारतीय कंपनीनं विकसित केली आहे.  

Updated: Nov 22, 2021, 10:32 PM IST
Breast Cancer | भारतीय कंपनीचं अभिमानास्पद संशोधन, ब्रेस्ट कॅन्सरचं होणार लवकर निदान title=

योगेश खरे, झी 24 तास, नाशिक | स्तनांच्या कर्करोगाचं (Breast Cancer) प्राथमिक अवस्थेतच निदान होऊ शकेल, अशी रक्तचाचणी भारतीय कंपनीनं विकसित केली आहे. विशेष म्हणजे भारतीय कंपनीच्या या संशोधनाला अमेरिकन एफडीएचं पेटंट मिळालं आहे. महिलांसाठी नवं संशोधन कसं उपयुक्त ठरणार आहे. पाहूयात हा रिपोर्ट. (Early Diagnosis of Breast Cancer Proud Research by Datar Cancer Genetics Limited company in Nashik)

नाशिकच्या दातार कॅन्सर जेनेटिक्स लिमिटेड कंपनीच्या नव्या संशोधनामुळं हजारो महिलांना नवं जीवनदान मिळणार आहे. अगदी प्राथमिक अवस्थेतच रक्त तपासणीद्वारे महिलांच्या ब्रेस्ट कॅन्सरचं निदान करणं आता शक्य होणार आहे. तब्बल 20 हजारांहून अधिक महिलांवर क्लिनिकल चाचण्या करून दातार जेनेटिक्सनं हे संशोधन केलंय. 

विशेष म्हणजे अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनानं या संशोधनाला मान्यता दिली आहे. त्यानुसार लवकरच ईझी चेक नावानं अत्यंत वाजवी दरात ही रक्त तपासणी महिलांसाठी उपलब्ध होणार आहे.

भारतात दरवर्षी सुमारे दीड लाख महिलांना स्तनांचा कर्करोग होतो साधारण तिसऱ्या आणि चौथ्या स्टेजमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचं निदान होतं. त्यावेळी मॅमोग्राफीसारखे त्रासदायक आणि खर्चिक उपचार करावे लागतात.

एवढं करूनही अनेकदा महिला त्यातून बऱ्या होत नाहीत. मात्र केवळ 5 मिलीलीटर रक्त घेऊन नवी ईझी चेक रक्तचाचणी करता येते. या चाचणीमुळं अगदी शून्य लक्षणं किंवा पहिल्या स्टेजमध्येच ब्रेस्ट कॅन्सरचं 99 टक्के अचूक निदान करणं शक्य होतं.

अमेरिकेत ट्रायनेत्रा ब्रेस्ट किंवा युरोप आणि यूकेमध्ये ट्रु चेक ब्रेस्ट या नावानं सध्या ब्रेस्ट कॅन्सर निदान करणारी चाचणी केली जाते. आता लवकरच भारतातही ईझी चेक नावानं ही चाचणी उपलब्ध होणार आहे. वेळीच निदान झाल्यानं आता भारतीय महिलांना देखील स्तनांच्या कर्करोगावर सहज मात करणं शक्य होणाराय. त्यासाठी दातार जेनेटिक्सचं करावं तेवढं कौतुक थोडंच आहे.