नांदेड : मराठवाड्यात काँग्रेसला मोठा झटका लागला आहे. अशोक चव्हाण यांचा पराभव झाला आहे. प्रतापराव चिखळीकर यांनी अशोक चव्हाण यांचा तब्बल ३० हजाराच्या मताधिक्याने पराभव केला आहे.
नांदेड हा काँग्रेसचा गड मानला जातो. २०१४ च्या मोदी लाटेत देखील अशोक चव्हाण यांचा लोकसभा निवडणुकीत विजय झाला होता. परंतु यंदाच्या निवडणुकीत मात्र त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे नांदेडमध्ये काँग्रेससाठी हा मोठा धक्का समजला जात आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी नांदेड मतदारसंघात कांटे की टक्कर होती. राज्यामध्ये भाजप-शिवसेनेची युती तर काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी होती. प्रकाश आंबेडकर यांचा भारिप बहुजन महासंघ आणि एमआयएम हे एकत्र निवडणुकीच्या मैदानात होते. या निवडणुकीत नांदेड मतदारसंघातून काँग्रेसनं त्यांचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना पुन्हा उमेदवारी दिली होती. तर भाजपचे प्रतापराव चिखलीकर हे अशोक चव्हाणांच्या विरोधात उभे होते. वंचित बहुजन आघाडीकडून यशपाल भिंगे निवडणुकीच्या रिंगणात होते.
२०१४ साली नांदेडच्या मतदारसंघातून अशोक चव्हाण विजयी झाले होते. राज्यात काँग्रेसने जिंकलेल्या २ जागांपैकी ही एक जागा होती. अशोक चव्हाण यांनी भाजपच्या डी.बी. पाटील यांचा ८१,४५५ मतांनी पराभव केला होता.