पुणे : कोरेगाव भीमाच्या विजय दिनाच्या कार्यक्रमानंतर झालेल्या हिंसाचार प्रकरणी राज्यभरात तीव्र पडसाद पडत असून या प्रकरणी शिव प्रतिष्ठानचे 'संभाजी भिडे यांचे आणि हिंदू एकता आघाडीचे मिलिंद एकबोटे यांच्या विरोधात अँट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यावर मिलिंद एकबोटे यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली.
भीमा कोरेगाव प्रकरणी पोलिसांनी हालगर्जीपणा केला. त्याला सरकार जबाबदार असल्याचे सांगतानाच 'संभाजी भिडे यांचे शिव प्रतिष्ठान आणि मिलिंद एकबोटे यांची हिंदू एकता आघाडीच्या कार्यकर्त्यांनी भीमा कोरेगावच्या विजयस्तंभाकडे आलेल्या जमावावर दगडफेक केली, हिंसाचार भडकवला', असा गंभीर आरोप भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
हिंसाचार घडवून आणल्याचा आरोप लावणे हे आपल्या विरोधात षडयंत्र आहे, अशी प्रतिक्रिया मिलिंद एकबोटे यांनी व्यक्ती केली.
ते म्हणाले, काल कोरेगाव भीमा या ठिकाणी जो प्रकार घडला तो अत्यंत दुर्दैवी आणि निंदनीय आहे. त्या रणस्तंभापाशी ज्या दलित बांधवांना जो त्रास सहन करावा लागला. त्याचा मी निषेध करतो. त्या ठिकाणी गैरसमजातून ही घटना घडली असावी. या संदर्भात संभाजी भिडे गुरूजी आणि माझी बदनामी करणाऱ्याचा काही कुटीलवादी संघटनांचा प्रयत्न सुरू आहे.
समस्त हिंदू आघाडी नेहमी दलित समाजाशी एकनिष्ठ राहिली आहे. आमच्या संघटनेत मोठ्या संख्येने दलित बांधव आहेत. क्रांतीवीर लहूजी आणि बाबासाहेब आंबेडकर हे आमचे आदर्श आहेत. त्यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन आम्ही हिंदुत्त्वाचे काम करत असल्याचेही एकबोटे यांनी सांगितले.
स्वप्नासुद्धा आपल्या माणसांवर हात उचलण्याचे समस्त हिंदू आघाडीच्या मनात सुद्धा येऊ शकत नाही. सर्वांना विनंती आहे की कोणताही गैरसमज मनात ठेऊ नका. जे लोक आमच्या संघटनेच्या विरोधात गैरसमज पसरवत आहेत त्यांना बळी पडू नका. आम्ही तुमचे आहोत आणि सदैव तुमचेच राहू, असेही एकबोटे यांनी स्पष्ट केले.