मुंबई : चालू वीज भरले असेल तर वीज कनेक्शन तोडले जाणार नाही असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. पण, ऊर्जा राज्य मंत्री म्हणतात, वीज कनेक्शन तोडावी अशी इच्छा नाही. पण, महावितरणची आर्थिक परिस्थिती गंभीर आहे. त्यांउळे हा निर्णय घ्यावा लागला. यावरून सरकारमध्ये अजित पवार यांच्या शब्दाला काहीच किमंत नाही असा टोला विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.
शेतकरी वीज प्रश्नावरून विधानसभेत लक्षवेधी सूचना उपस्थित करण्यात आली होती. त्यावरून विरोधकांनी ऊर्जा मंत्र्यांना धारेवर धरलं. देवेंद्र फडणवीस म्हणाले, अजित पवार सांगतात चालू वीज भरले तर कनेक्शन तोडले जाणार नाही. पण, अधिवेशन संपले आणि कनेक्शन तोडायला सुरवात झाली.
उपमुख्यमंत्री सभागृहात आश्वासन देतात. पण, त्याची अंमलबजावणी होत नाही. आताही ते म्हणतात वीज कनेक्शन तोडली जाणार नाही. जर गेल्यावेळचे तुमचे कुणी मंत्री ऐकत नसतील तर आता काय ऐकणार? तुमच्या शब्दाला किंमतच राहिली नाहीय, असा टोला त्यांनी लगावला.
ऊर्जा राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या प्रश्नाला उत्तर देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्या उत्तराने विरोधी पक्षाचे आमदार अधिकच आक्रमक झाले. ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी उपमुख्यमंत्री पवार यांनी सत्य मांडले होते. थकबाकीचे हप्ते पाडून देत आहोत. पण, वीज कनेक्शन तोडले जात नाही असे सांगितले.
ऊर्जामंत्री राऊत यांच्या उत्तरावर फडणवीस अधिकच आक्रमक झाले. सरसकट वीज कनेक्शन तोडले जात आहे म्हणूनच तुम्हाला समर्थन देणारे राजू शेट्टी आंदोलन करत आहेत. उपमुख्यमंत्री यांनी अभ्यास करून आश्वासन दिले नव्हते का? त्यांनी जे आश्वासन दिले ते पाळले जाणार की नाही हे स्पष्ट सांगा. अन्यथा, उपमुख्यमंत्री यांच्याविरोधात हक्कभंग दाखल करू असा इशारा दिला.