अमरावती : जिल्ह्यातील चांदुर बाजार तालुक्यातील शिरजगाव कसबा इथल्या बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत हेराफेरी झाल्याचा प्रकार उघड झाला आहे. तब्बल 26 खातेदारांच्या अकाऊंटमधून 11 लाख 59 हजार रुपये परस्पर काढल्याचे समोर आलंय.
शेती, शेतमजुरी आणि व्यवसाय करुन या गावातल्या नागरिकांनी या बँकेच्या शाखेत पैसे जमा केले होते. मात्र आपल्या अकाऊंटमधील पैसे काढण्यासाठी गेलेल्या खातेदारांना अकाऊंटमध्ये पैसेच नसल्याचे आढळलं. परस्पर विड्रॉअलद्वारे या पैशांवर डल्ला मारल्याचं समोर आलंय.
याविषयी बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली आहे. या विषयावर वरिष्ठाशी बोलणे झाले असून बँकेची अंतर्गत चौकशी सुरु असल्याचं सांगत बँक अधिका-यांनी कॅमे-यासमोर बोलण्यास नकार दिलाय.
तक्राद्रार आणि गावाचे सरपंच यांनी या संदर्भात पोलिसांत तक्रार दिली असून पोलिसांनी गुन्हे दाखल केलेत. या प्रकरणी अशा तक्रारींमध्ये वाढ होत असून रोकड काढल्याचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.