गडचिरोली / नागपूर : Gadchiroli Rain and flood situation : गडचिरोली जिल्ह्यातील पूर परिस्थितीची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे रात्री विशेष विमानाने मुंबईसाठी रवाना झाले. गडचिरोली जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या भागाचा दौरा केल्यानंतर गडचिरोली येथे पूर परिस्थितीचा आढावा घेतला. गडचिरोलीच्या दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्र्यांनी पहिल्याच भेटीत गडचिरोलीच्या दोन प्रलंबित प्रश्नांना न्याय मिळवून दिला. आपल्या पहिल्याच दौऱ्यात दरवर्षी संपर्क तुटणाऱ्या गावांसाठी कायमस्वरूपी व्यवस्था निर्माण करणार तसेच गडचिरोली मेडिकल कॉलेज सुरु करणार असे जाहीर केले.
गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. दक्षिण गडचिरोलीत भामरागड, अहेरी आणि सिरोंचा येथे कित्येक रस्ते पावसाच्या पाण्यामुळे बंद आहेत. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी तातडीचा गडचिरोली दौरा केला. खराब हवामानामुळे नागपूर येथून हवाई मार्गाने येणे आणि पाहणी करणे शक्य झाले नाही, मात्र रस्ते मार्गाने येऊन त्यांनी पाहणी केली. त्यानंतर नियोजन भवन येथे जिल्हा आपत्ती निवारण व्यवस्थापनाबाबत आढावा बैठक घेतली.
पूर्वी पालकमंत्री म्हणून काम केल्यामुळे येथील समस्यांची जाण आहे. नक्षग्रस्त असलेल्या गडचिरोली जिल्ह्याला दर पावसाळ्यात संपर्क तुटणाऱ्या गावांची संख्या असणे योग्य नाही. त्यामुळे ही समस्या कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी या गावांचा कधीच संपर्क तुटणार नाही अशा शाश्वत उपाययोजना केल्या जातील, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.
गडचिरोली जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या भागाचा दौरा केल्यानंतर गडचिरोली येथे पूर परिस्थितीचा आढावा घेतला. खराब हवामानामुळे हेलिकॅप्टर ऐवजी रस्ते मार्गाने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी गडचिरोली येथील प्रत्यक्ष पूरपरिस्थिती आणि बाधित भागाची पाहणी केली त्यानंतर नागपूर येथील विमानतळावरुन विशेष विमानाने मुंबईकडे प्रयाण केले.