Railway Platforms News in Marathi: भारतात दररोज लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करत असतात. अनेक परप्रांतीय लोक दररोज रेल्वेने स्थानकात ये-जा करतात आणि ट्रेन पकडतात. भारतीय रेल्वेची देशभरात हजारो स्थानके आहेत. रेल्वे स्थानकांवर अनेक प्रकारचे खाद्यपदार्थांचे स्टॉल आहेत. जेणेकरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना येथे खाद्यपदार्थ मिळू शकतील. मात्र आता याच खाद्यपदार्थसंदर्भात मोठी अपडेट समोर आली असून रेल्वे स्थानकांवरील खाद्यपदार्थ स्टॉलवरुन आता गरमागरम पदार्थ मिळणार नाहीत. या मागचे कारण काय ते जाणून घ्या..
रेल्वे प्रशासनाने रेल्वे प्लॅटफॉर्मवरील खाद्यपदार्थविक्रेत्यांना तसेच स्थानकावरील उपहारगृहांत अन्न शिजविण्यासाठी विक्रेत्यांना एलपीजी गॅसचा वापर करण्यास रेल्वेने बंदी घातली आहे. गेल्या दोन दिवसांपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली असून प्रवाशांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
देशभरातील सर्व रेल्वे स्थानकांवर अन्न शिजवण्यासाठी गॅसच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर असते. त्यामुळे त्यांच्यासुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. प्लॅटफॉर्मवरील फक्त खाद्यपदार्थांच्या स्टॉल्स आणि उपहारगृहात इलेक्ट्रिक शेगड्या वापरण्याची परवानगी आहे.
दरम्यान प्रवाशांच्या सुरक्षेसाठी लांबपल्ल्या आणि इतर रेल्वे गाड्यांमध्ये गॅस वापरून अन्न शिजवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. पुणे रेल्वे स्थानकात 32 स्टॉल्स आणि 5 उपहार गृह आहेत. रेल्वे प्रशासनाने त्यांना दोन दिवस आधी पत्र पाठवून निर्णयाची अंमलबजावणी करण्यास सांगितले आहे. तसेच गॅसचा वापर करून खाद्यपदार्थ शिजवले गेल्यास संबंधित उपहारगृहचालक किंवा खाद्यपदार्थ विक्रेत्याचा परवाना रद्द करण्याचाही इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे आता खाद्यपदार्थ विक्रेत्यांना बाहेरुन खाद्यपदार्थ तयार करुन ते प्रवाशांना द्यावे लागणार आहेत. रेल्वेच्या या निर्णयामुळे नाराजीचा सूर उमटत आहे. कारण गॅसवर बंदी दिल्यामुळे प्रवाशांना थंड खाद्यपदार्थ मिळतील असं विक्रेत्यांचं म्हणण आहे.
मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने हा निर्णय घेतला आहे. यानुसार उपनगरीय स्थानकांच्या फलटांवर सर्व प्रकारची स्वयंपाकास बंदी दिली. उपनगर सोडून इतर कोणत्याही स्थानकांवर विजेच्या उपकरणांचा वापर करून स्वयंपाक करतील. रेल्वेने सर्व परवानाधारक फूड प्लाझा, फास्ट फूड स्टॉल्स, जन आहार कॅन्टीन, चहाचे स्टॉल आणि इतर खाद्यपदार्थ विक्रेत्यांना फलाटांवर स्वयंपाक करणे थांबवण्याची सूचना केली आहे. नवीन नियमांचा पुणे, शिवाजीनगर, खडकी, दापोडी, कासारवाडी, पिंपरी, चिंचवड, आकुर्डी, देहू रोड, भेगडेवाडी, तळेगाव, वडगाव, कामशेत आणि मावळी किंवा इतर ठिकाणच्या खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर परिणाम होणार आहे.