कोल्हापूर: गेल्या सात दिवस बंद असलेला पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी सकाळपासून एकेरी वाहतूक सुरु झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोली येथे पंचगंगेच्या पुलाच्या अलीकडे महामार्ग पाण्याखाली गेल्याने मागील सात दिवसांपासून या मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. यानंतर आजपासून महामार्गावरील एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली. मात्र, तुर्तास अत्यावश्यक सेवांसाठीच ही वाहतूक सुरू आहे. आज संध्याकाळपर्यंत सर्व वाहनांसाठी वाहतूक खुली होईल, असा अंदाज आहे.
काल प्रशासनाने धाडसाने महामार्गावरून पाणी वाहून जात असतानाही इंधनाचे टँकर कोल्हापूर शहरात सोडले होते. मार्गावर जिथे पाण्याचा प्रवाह जलद होता तिथे जेसीबी उभा करून त्याच्या आडून इंधनाचे आठ टँकर काल कोल्हापूरात पाठवण्यात आले. आजही इंधनाचे काही टँकर त्याच पद्धतीने कोल्हापूरात पाठवले जातील. तर संध्याकाळपर्यंत पाणी ओसरण्याची शक्यता असल्याने इतर वाहतूकही कोल्हापूरच्या दिशेने सुरू केली जाईल. सध्या या मार्गावरील सर्व वाहने पंचगंगेच्या पात्रापासून कराडपर्यंत थांबण्यात आली आहेत.
सांगलीत पूरक्षेत्रात बांधकाम करणाऱ्यांवर मुख्यमंत्र्यांकडून कारवाईचा इशारा
सांगलीला महापुराचा तडाखा बसला आणि लाखो लोक पुराने बाधित झाले. या पुरात १३ हजार घरे आणि दुकान पाण्याखाली गेली आहेत. महापूर जरी १५ वर्षांनंतर पुन्हा आला असला तरी सांगली शहरातील अनेक घरात जवळपास दरवर्षी पुराचं पाणी जातंय. पूर्वीची घरं बाधित होतातच मात्र पूररेषेच्या आतील भागात महापालिकेकडून नवीन बांधकामांना, परवाने दिल्याने नवीन घर सुद्धा तयार होतात आणि पुराच्या वेळी ती पाण्याखाली जातात. 2005 नंतर बांधलेला सांगली महापालिकेच्या आयुक्तांचा शासकीय बंगला हा सुद्धा पूरपट्यात असून तो ही पुराच्या वेळी पाण्यात जातो.
असा कारभार म्हणजे एकीकडे आपत्ती व्यवस्थापन, तर दुसरीकडे आपत्तीलाच निमंत्रण असा आहे. सांगलीची मुख्य बाजारपेठही पाण्याखाली जात असल्याने कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे. सततच्या पुराचा विचार करून आता नवी मुंबईच्या धर्तीवर 'नवी सांगली' तयार करण्याचा पर्याय पुढे येत आहे. दरम्यान पूरपट्यात बांधकाम परवाने देणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.