रत्नागिरी : रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार नवीनचंद्र बांदिवडेकराची उमेदवारी वादात सापडली आहे. नवीनचंद्र बांदिवडेकर हे 'सनातन संस्थे'चे कोकण विश्वस्थ आहेत. इतकंच नाही तर नालासोपारा बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी वैभव राऊत याला सोडवण्यासाठी काढण्यात आलेल्या मोर्चात बांदिवडेकर यांचाही समावेश होता. अशात काँग्रेसनं बांदिवडेकरांना उमेदवारी दिल्यानं काँग्रेसची ही उमेदवारी वादात सापडली आहे. ठाण्यातल्या गडकरी रंगायतन स्फोट तसंच डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणात नाव समोर आल्यानं 'सनातन संस्था' वादग्रस्त ठरलीय.
नवीनचंद्र बांदिवडेकर यांची ओळख भंडारी समाजाचे नेते अशी आहे. ते 'अखिल भारतीय भंडारी समाज महासंघा'चे राष्ट्रीय अध्यक्षही आहेत. लोकसभा निवडणूक २०१९ साठी त्यांना काँग्रेसकडून रत्नागिरी - सिंधुदुर्ग मतदारसंघाची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. 'दैनिक सनातन प्रभात'नं प्रकाशित केलेल्या वृत्तात वैभव राऊतला सोडवण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या मोर्चात बांदिवडेकर यांचंही भाषण झालं होतं. 'वैभव राऊत हिंदुत्वाच्या रक्षणासाठी झटला' या शब्दात बांदिवडेकर यांनी राऊतचं कौतुक केलं होतं.
काँग्रेसनं मात्र नवीनचंद्र बांदिवडेकर यांची बाजू सांभाळत हे सर्व आरोप फेटाळून लावलेत. बांदिवडेकरांचा सनातनशी कोणताही संबंध नाही.. सनातनच्या कोणत्याही कार्यात त्यांचा सहभाग नसून ते सनातनची विचारधारा आणि त्यांच्याविरोधात असल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केलंय. यासंबंधी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे सरचिटणीस-प्रवक्ते सचिन सावंत यांनी एक प्रसिद्धीपत्रकही जाहीर केलं आहे. 'सनातच्या कोणत्याही कार्यक्रमात बांदिवडेकर यांनी सहभाग घेतला नाही किंवा सनातनच्या विचारांशी त्यांना सहानुभूती नाही' असं या पत्रकात म्हटलं गेलंय.