Sanjay Raut Slams Ex CJI Dy Chandrachud: विधानसभा निवडणुकीमध्ये झालेल्या महाविकास आघाडीच्या मानहानीकारक पराभवासाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच प्रवक्ते तसेच राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी थेट माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी जबाबदार ठरवलं आहे. पत्रकारांशी संवाद साधताना राऊतांनी कठोर शब्दांमध्ये चंद्रचूड यांच्यावर टीका केल्याचं दिसून आलं. "ज्या पद्धतीने निकाल लागले ते संशयास्पद आहे. निकाल आधीच ठरला होता मतदान नंतर करुन घेतलं. या महाराष्ट्रातील सगळ्या घडामोडींना कोणी जबाबदार असेल तर ते माजी सरन्यायाधीश डी. व्हाय. चंद्रचूड आहेत. देशाचं सुप्रीम कोर्ट ज्यांनी वेळेत निर्णय द्यायला पाहिजे होता. आमदार अपात्रतेसंदर्भात त्यांनी निर्णय द्यायला पाहिजे होता. तुम्ही कशाला खुर्चा उबवत आहात. तुम्ही कशा करता बसला आहात? अडीच तीन वर्ष तुम्ही निर्णय देत नसाल तर का बसला आहात? सरकारच्या, जनतेच्या पैशाचा कशाला चुरडा करत आहात?", असा सवाल विचारत संजय राऊतांनी निशाणा साधला आहे.
"उद्धव ठाकरेंनी सांगितलं त्याप्रमाणे, धनंजय चंद्रचूड प्रोफेसर म्हणून लेक्चरर म्हणून बाहेर भाषणं द्यायला चांगले आहेत. सरन्यायाधीश म्हणून ते घटनात्मक पेचावर निर्णय देऊ शकेल नाहीत. यासाठी इतिहास त्यांना माफ करणार नाही. जर त्यांनी योग्य निर्णय दिला असता तर महाराष्ट्रातलं आजचं चित्र बदललं असतं. आज जे चित्र तुम्हाला दिसतंय ते नक्कीच दिसलं नसतं. त्यांनी निर्णय न दिल्याने पक्षांतराची दारं-खिडक्या ते उघडे ठेऊन गेले आहेत. आताही कोणी, कशाही, कुठेही उडी मारु शकेल, विकत घेऊ शकेल. कायद्याची, दहाव्या शेड्यूलची भितीच राहिलेली नाही. न्यायमूर्तीनी भिती घालवली, तुम्ही खुशाल पक्षांतरे करा आम्ही येथे बसलेलो आहोत. या सगळ्या घटनेला दुर्घटनेला न्यायमूर्ती चंद्रचूड जबाबदार आहेत. इतिहासात त्याचं नाव काळ्याकुट्ट अक्षरात लिहिलं जाईल हे मी सांगतो," असंही राऊत म्हणाले.
जनतेच्या न्यायालयात जातो असं उद्धव ठाकरे म्हणालेले, असं म्हणत राऊतांना प्रश्न विचारण्यात आला. "जनतेच्या न्यायालयात न्याय विकत घेण्यात आला. प्रचंड पैसा वापरुन तो न्याय विकत घेतला तसा हा पण विकत घेतला. मात्र आम्ही निराश झालो नाही. आम्हाला वाईट जरुर वाटलं. महाराष्ट्र कोणत्या दिशेने जातोय. महाराष्ट्राचं काय होणार? महाराष्ट्राच्या भविष्याची चिंता आम्हाला आहे ना," असं राऊत म्हणाले.
नक्की वाचा >> विधानसभेच्या धक्क्यानंतर राज-उद्धव एकत्र येणार? राऊतांचं सूचक विधान; म्हणाले, 'राज ठाकरेंनी...'
महाराष्ट्राच्या हितासाठी जो कोणी असेल. कुणी भाजपा, समाजवादी, अन्य पक्ष किंवा एमआयएममध्ये असतील त्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे, असंही राऊत यावेळेस म्हणाले.