महाराष्ट्राचा UP, बिहार होतोय? एका महिन्यात चार गोळीबार; देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी

महाराष्ट्राला हादरवणाऱ्या घटना घडल्या आहेत. एका महिन्यात गोळीबाराच्या चार घटना घडल्या आहेत.यामुळे कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. 

वनिता कांबळे | Updated: Feb 8, 2024, 11:56 PM IST
महाराष्ट्राचा UP, बिहार होतोय? एका महिन्यात चार गोळीबार; देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी title=

Dahisar Firing  Abhishek Ghosalkar : महाराष्ट्राला हादरवणाऱ्या भयानक घटना घडत आहेत. एका महिन्यात गोळीबाराच्या चार घटना घडल्या आहेत.  राज्यात गोळीबाराच्या घटना कित्येकदा घडल्या. मात्र, कॅमेरासमोर किंवा फेसबुक लाईव्ह करताना असा गोळीबार घडल्याचे याआधी महाराष्ट्राने कधी पाहिलं नव्हतं. एकूणच राज्यातल्या कायदा आणि सुव्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह करणाऱ्या या घटना आहेत. महाराष्ट्राचा UP, बिहार होतोय का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.  

एका महिन्यात गोळीबाराच्या चार घटना

पहिली घटना 5 जानेवारी 2024 ला घडली आहे. पुण्यातला कुख्यात गुंड शरद मोहोळवर नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच गोळीबार करण्यात आला. भर दिवसा धाडधाड गोळ्या झाडून मोहोळची हत्या करण्यात आली. दुसरी घटना 2 फेब्रुवारी  कल्याणजवळील उल्हासनगरमध्ये घडली आहे.  सत्ताधारी भाजपचा आमदार गणपत गायकवाड यांनी भर पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार केला आहे. भाजपच्या आमदारांनी शिंदे गटाच्या पदाधिका-यावरच गोळीबार केला. तर, तिसरी घटना 7 फेब्रुवारीला जळगावमध्ये घडली आहे. जळगावच्या चाळीसगावमध्ये भाजपच्या माजी नगरसेवकावर गोळीबार झाला. चाळीसगाव शहरातील हनुमान वाडीमधली ही घटना आहे. माजी भाजप नगरसेवक महेंद्र उर्फ बाळू मोरे आपल्या कार्यालयात बसलेले असताना, तोंडाला रुमाल बांधून आलेल्या 4 ते 5 तरुणांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. मोरे यांची प्रकृती चिंताजनक असून, गोळीबाराचं CCTV फुटेज समोर आले आहे. चौथी घटना आज 8 फेब्रुवारी रोजी मुंबईच्या दहिसरमध्ये घडली आहे. माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची अगदी जवळून गोळी झाडून हत्या करण्यात आली. ते  माजी आमदार विनोद घोसाळकरांचे चिरंजीव आहेत. अभिषेक घोसाळकरांवर गोळ्या घालणाऱ्या मॉरिसची स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. 

संजय राऊत यांनी शेअर केला मॉरिसचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबतचा फोटो

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मॉरिसचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबतचा फोटो एक्स या सोशल मिडियावर शेअर केला आहे. महाराष्ट्रात गुंडा राज!
अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडणारा मोरिश narohna चार दिवसांपूर्वीच वर्षा बंगल्यावर होता.मुख्यमंत्री त्याला भेटले. मोरीश याला शिंदे सेनेत येण्याचे आमंत्रण दिले!(वर्षा बंगला गुंड टोळ्यांचा अड्डा झालाय)आज त्यानें अभिषेकवर गोळ्या चालवून बळी घेतला! फडणविस गृहमंत्री म्हणून पूर्ण अपयशी! राजीनामा द्या! अशी पोस्ट संजय राऊत यांनी केली आहे.  महाराष्ट्रात गुंडांचे राज्य सुरू आहे असे मी रोज सांगत आहे. मुख्यमंत्री आणि त्यांचे बाळराजे रोज गुंड टोळ्याना भेटतात. पक्षात प्रवेश देतात.गृहमंत्री अदृश्य झाले आहेत.. राज्य गुंडांच्या तावडीत आहे. म्हणूनच कायद्याची भीती उरली नसून पोलिस हे शिंदे गँगच्या सेवेसाठीच उरले आहेत. अभिषेक घोसाळकर यांच्यावरील गोळीबार धक्कादायक आहे.अभिषेक मृत्यूशी झुंज देतोय..आणि गृहमंत्री फडणवीस चाय पे चर्चा करीत फिरत आहेत! फडणवीस राजीनामा द्या! अशी आणखी एक पोस्ट देखील संजय राऊत यांनी केली आहे. 

पोलिसांची दहशतच संपली - जितेंद्र आव्हाड

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाडयांनी देखील संताप व्यक्त केला आहे.  महाराष्ट्रात लागोपाठ उघडपणे गोळीबाराच्या घटना घडणं, ही अतिशय गंभीर बाब आहे.  ‘सागर’ बंगल्यावर बसलेल्या गृहमंत्र्यांचं महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्थेकडे लक्ष आहे की नाही असा प्रश्न पडतो.  सरकार कुणाचंही असो पुरोगामी महाराष्ट्राची वाटचाल युपी/बिहारच्या दिशेने होणं ही इथल्या प्रत्येकासाठी शरमेची बाब आहे. जिथे राजकीय नेत्यांवर उघडपणे गोळीबार होतोय तिथे जनतेच्या सुरक्षेची काय गॅरंटी असणार..? महाराष्ट्राचा बिहार झाला, असे म्हणण्यात आता काहीच अर्थ उरला नाही. कारण, महाराष्ट्राने बिहारला खूप मागे सोडलं आहे. गुंडांनी जणू काही महाराष्ट्र आपल्या मुठीत बंदिस्त करून टाकला आहे. हतबल सरकार उघड्या डोळ्यांनी सारं काही पाहतंय. पोलिसांची दहशतच संपली आहे. पोलीस दलात होणाऱ्या हस्तक्षेपामुळे पोलिसांनाही मर्यादा येत आहेत. पोलिसांवर फक्त विरोधकांना संपवण्याची जबाबदारी आहे; कायदा आणि सुव्यवस्था गेली खड्ड्यात !  
दुर्देवं आहे, महाराष्ट्राचे !  इतक्या घटना घडूनही सरकारला लाज कशी वाटत नाही. जनता हे सगळं उघड्या डोळ्यांनी बघतेय; जनतेमधील रोष वाढतोय. पण, लोकांचा जीव जाणे, याला सरकारच जबाबदार आहे, हे सरकारने लक्षात घ्यावे. परवा कल्याण, आज मुंबई... अजून काय माहित किती घटना घडणार आहेत? कधी पुणे, कधी ठाणे तर कधी मुंबई  खुनांचा थरार सुरूच आहे अशी पोस्ट जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.