Ajit Pawar: राज्यात मोठा राजकीय भूकंप येणार राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) भाजप पक्षामध्ये प्रवेश करणारा अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. त्यातच अजित पवार यांनी त्यांचे सर्व कार्यक्रमक रद्द केले होते. यामुळे चर्चेला उधाण आले होते. मात्र, अजित पवार यांनी माध्यमांसमोर येत याचा खुलासा केला होता. यानंतर आता पुन्हा एकदा अजित पवार यांनी अचानक त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत (Maharashtra Politics).
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपले सर्व कार्यक्रम रद्द केल्यामुळे पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. पिंपरी-चिंचवडमधले अजित पवारांचे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्ष कविता अल्हाट यांच्या घरी अजित पवार सदिच्छा भेट देणार होता. तसेच चिखलीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यालाही ते हजेरी लावणार होते. त्यानंतर माजी नगरसेविका शमीम पठाण यांच्या निवासस्थानी ईदनिमित्त सदिच्छा भेट देणार होते. मात्र, अचानक अजित पवारांचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. काही दिवसांपूर्वी पित्ताचा त्रास झाल्यानं त्यांचा सातारा दौरा रद्द करण्यात आला होता.
विरोधी पक्षनेते अजित पवारांनी दिलखुलास दादा या मुलाखतीच्या कार्यक्रमात बिनधास्तपणे आपली मतं मांडली. यावेळी बोलताना त्यांनी राष्ट्रवादीचा मुख्यमंत्रिपदावर दावा कायम असल्यापासून ते आपल्याला मुख्यमंत्री व्हायला आवडेल असं सांगत वेगवेगळ्या मुद्यांवर जोरदार उत्तर दिली होती.
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्याबाबत मविआच्या नेत्यांनी सावध भूमिका घेतली आहे. मुख्यमंत्रीपदाची अजित पवारांची क्षमता आहे असं राऊत म्हणाले. तर 145 चा आकडा असेल तर अजित पवारांनी मुख्यमंत्री व्हावं असं काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी म्हटले आहे. अजित पवार धडाडीचे कार्यकर्ते आहेत, ते बहुमताच्या बाजूने आल्यास राज्याचे मुख्यमंत्री होऊ शकतात असं वक्तव्य केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केलंय. रावसाहेब दानवेंच्या वक्तव्याने पुन्हा भुवया उंचावल्या आहेत.
अजित पवारांची बदनामी महाविकास आघाडीतले नेतेच जाणीवपूर्वक करत असल्याचा गंभीर आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केला आहे. पहाटेच्या शपथविधीनंतर अजित पवारांच्या जीवनावर, त्यांच्या भूमिकेवर आणि कामावर स्वपक्षीयांकडूनच प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात असल्याचा आरोपही बावनकुळेंनी केला आहे.