Maharashtra Politics: ऑस्कर्ससाठी निवड झालेला 'लापता लेडीज' हा चित्रपट आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये केंद्रस्थानी येणार की काय अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळामध्ये सुरु झाली आहे. यामागील कारण म्हणजे याच चित्रपटाच्या नावाने राज्यभरामध्ये पोस्टर बाजी करत थेट सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधण्यात आला आहे. विशेष म्हणजे या पोस्टरवर राज्यात सत्तेत असलेल्या तिन्ही महत्त्वाच्या नेत्यांची प्रतिमा झळकत आहे.
हिरव्या रंगाचं बॅकग्राऊण्ड असलेल्या या पोस्टवर 'लापता लेडीज' चित्रपटाच्या पोस्टरप्रमाणे मात्र थेट चेहरे न दिसणाऱ्या दोन महिला दिसत आहेत. तसेच या पोस्टरच्या खालच्या बाजूला डावीकडून उजवीकडे अजित पवार, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिकृती दिसत आहेत. या तिन्ही मंत्र्यांचे पूर्ण चेहरे नसून पोस्टरप्रमाणे केवळ ओठ आणि नाक दाखवण्यात आलं आहे. मात्र चित्रांवरुन हे नेते कोण आहेत हे स्पष्ट होत आहे.
महाराष्ट्रभर लावण्यात आलेले 'लापता लेडीज'चे पोस्टर्स हे काँग्रेसकडून लावण्यात आले आहेत. पोस्टर्समधून बेपत्ता महिलांसंदर्भातील प्रश्नावर सरकारला जाब विचारण्यात आला आहे. पोस्टर्समधून कलात्मकरित्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्रातील सर्वोच्च नेते तथा गृहमंत्री व उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवारांचे चेहरे दाखवत सरकारवर टीका करण्यात आली आहे. प्रत्येक वर्षी, महाराष्ट्रातील 64 हजार महिला अन् मुली बेपत्ता होतात ही अत्यंत गंभीर बाब आहे, असं या पोस्टर्समधून सांगण्यात आलं आहे. 'लापता लेडीज... 1 वर्षात 64,000 महिला बेपत्ता...' अशी ओळ या पोस्टर्सवर आहेत.
"गृहमंत्री आणि त्यांचे काम पूर्णतः निष्क्रिय ठरले आहे. हे सरकारचे अपयश असून ज्यामुळे महाराष्ट्रातील महिलांची सुरक्षा धोक्यात आली असून राज्याची कायदा व सुव्यवस्था ढासळली आहे," अशी टीका काँग्रेसने केली आहे. काँग्रेसच्या या मोहिमेचे पोस्टर्स आता संपूर्ण राज्यभर झळकत आहेत.
महाराष्ट्रामध्ये मागील महिन्यात बदलापूरमधील प्रकरणानंतर तसेच इतरही काही प्रकरण समोर आल्यानंतर महिलांविरोधातील अत्याचाराच्या मुद्द्यावरुन विरोधकांकडून सरकारवर निशाणा साधण्यात आला. एकीकडे सरकारी योजनेअंतर्गत महिलांना महिना दीड हजार रुपये दिले जात असतानाच दुसरीकडे महिला सुरक्षित नसल्याचं गुन्हेगारीच्या आकडेवारीवरुन स्पष्ट होत असल्याचा दावा विरोधकांनी केला आहे. अशाच पद्धतीचे आरोप आता काँग्रेसने या पोस्टर्सच्या माध्यमातून केले आहेत. हे पोस्टर्स राज्यात अनेक ठिकाणी झळकत आहेत. आता या पोस्टर्सवर सत्ताधारी काय उत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.