Maharashtra Politics : राष्ट्रवादीच्या (NCP) फुटीनंतर शरद पवार गट आणि अजित पवार गटाचा वाद निवडणूक आयोगाच्या कोर्टात गेला आहे. दोन्ही गटांनी एकमेकांवर आरोपप्रत्यारोप केले आहेत. अशातच खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यावर निशाणा साधत आमचे खासदार चांगले काम करत असल्याचा दावा केला होता. श्रीनिवास पाटील यांनी अपात्र होण्यासारखं काहीही केलं नाही असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं होतं. त्यावर सुनील तटकरे यांनी टीका केली होती. राष्ट्रवादीच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनीही एक कविता पोस्ट करुन सुप्रिया सुळेंवर निशाणा साधला आहे.
बारामतीत दादा… दादा… दादा करत ज्यांचं आयुष्य गेलं. मग, अजित पवार यांच्याविरोधात अपात्रतेची याचिका दाखल करताना राजकीय विचार वेगळे असल्याचं सुचलं, असं म्हणत सुनील तटकरेंनी सुप्रिया सुळेंवर टीका केली होती. त्यानंतर रुपाली चाकणकर यांनीही सुप्रिया सुळेंवर कवितेच्या माध्यमातून टीका केली आहे. रुपाली चाकणकर यांनी सोशल मीडियावर ही कविता पोस्ट केली आहे.
कोणती आहे ती कविता?
तीन टर्म बारामती लोकसभा मतदारसंघात ज्यांच्या जिवावर निवडून येतात त्यांनाच विचारतात प्रश्न…?
दादासमोर नाक उचलून
धाकुटी विचारे
तू कुठं काय केलंस?
चंदनाच्या खोडाला
सहाण विचारे
तू कुठं काय केलंस?
तो झिजला, पण विझला नाही
देहाची कुडीच विचारे
तू कुठं काय केलंस?
पाया भरला, विटा-वासे तोलून धरले
घराचा उंबराच विचारे
तू कुठं काय केलंस?
नांगर धरला, शेती केली
भुईला भीमेचं भान दिलं
मुसक्यांची गाठ विचारे
तू कुठं काय केलंस?
घामाला दाम दिला
कष्टाला मान दिला
रक्ताचं पाणीच विचारे
तू कुठं काय केलंस?
प.पा.
सुनील तटकरेंची टीका
"सुप्रिया सुळे, मोहम्मद फैजल आणि श्रीनिवास पाटील यांच्याविरोधात अपात्रतेची याचिका दाखल केली आहे. शरद पवारांविरुद्ध कुठलीही अपात्रतेची याचिका दाखल केली नाही. कारण, शरद पवार हे आमचे दैवत आहेत. अजित पवारांनी 30 वर्षे बारामती शहर उभे केले. दादा… दादा… दादा बोलत ज्यांचं राजकीय आयुष्य गेलं. मग, अजित पवारांविरोधात याचिका दाखल करताना राजकीय विचार वेगळे असल्याचं सुचलं. श्रीनिवास पाटलांबद्दल मला आदर आहे. पण, राजकीय लढाईत वयोमर्यादा हा विषय नाही,' असं सुनील तटकरेंनी म्हटलं होतं.
काय म्हणाल्या होत्या सुप्रिया सुळे?
"अजित गटाच्या नेत्यांनी आमचे खासदार श्रीनिवास पाटील, मोहम्मद फैजल, फौजिया खान आणि वंदना चव्हाण यांना अपात्र करण्याची मागणी का केली हे समजत नाही. आमचे हे खासदार चांगले काम करत आहेत. पाटील यांचे वय 83 वर्षे आहे. ते साताऱ्याचे खासदार आहेत. ते त्यांच्या कामात अतिशय कुशल आहेत. तो कोणते चांगले काम करतात हे केवळ साताराच नाही तर संपूर्ण राज्याला माहीत आहे. त्यांच्यावर कारवाईची मागणी ही नवीन गोष्ट मला दिसत आहे. त्यांच्यावर कारवाईची मागणी होत असल्याने त्यांनी काय केले हे मला समजू शकले नाही. त्यांना बळी का बनवले गेले हे देखील मला माहित नाही," असे सुप्रिया सुळे यांनी म्हटलं होतं.