Maratha Reservation: मनोज जरांगे पाटलांचे बोलणे मग्रुरीचे होते. त्यांच्या अकलेची कुवत उघडी पडली आहे. एखाद्या जात समुह म्हणून गलिच्छ राजकारण सुरु आहे, अशी टीका गुणरत्न सदावर्ते यांनी केली. ही सभा विराट झाली नाही. यात्रा पेक्षा या सभेपेक्षा मोठ्या होतात. एक मराठा लाख मराठा ही घोषणा सीमेवरील सैन्याची आहे, ती समाजाची नाही. आरक्षण मागणीवर नाही तर परिस्थितीवर असतं, असेही सदावर्ते म्हणाले.
जरांगे पाटील यांचे राजकीय बॉस वेगळे आहेत, असा आरोप यावेळी सदावर्ते यांनी केला. मला शांत करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आजसुद्धा जरांगे स्वत:ला पाटील म्हणतात. पाटीलकी सुपरमसीकडे असते. त्यांच्यासाठी आरक्षण असते का? असा प्रश्न त्यांनी केला.
जो समाज मागास नाही त्यांना पैसे देणे गैर आहे, असे गुणरत्न म्हणाले. आज जरांगे बोलले त्या गोष्टीला कुठेही कायदेशीर कनेक्टिव्हीटी नाही. त्यांना फक्त गुन्हे परत घ्यायचे आहेत. त्यांचा आरक्षणाशी संबंध नाही, असे सदावर्ते म्हणाले.
"सदावर्ते हे फडणवीसांचे कार्यकर्ते आहेत असं लोक म्हणतात. फडणवीस यांनी त्यांना समज द्यावी", असं जरांगेंनी आपल्या भाषणात म्हटलं. सदावर्तेंचा एकेरी उल्लेख करत जरांगेंनी कठोर शब्दांमध्ये त्यांच्यावर टीका केली. "ते (सदावर्ते) रात्री म्हणलं मला अटक करा. ते म्हणतंय मी हिंसा करीन. अरे, मराठ्यांची औलाद हिंसा करणाऱ्यांची नाही. त्याला यश मिळायचं होतं तेव्हा त्याने एक मराठा आणि लाख मराठाची घोषणा आझाद मैदानात दिली होती. आता एक लाख मराठे एकत्र आलेत, लेकरांचं कल्याण होणार आहे. ह्यो हिंसा करणार आहे आणि याला अटक करा. मला अटक करणं एवढं सोपं आहे का?" असं म्हणातच उपस्थितांनी जरांगेंना प्रतिसाद दिला.
सदावर्तेंना लक्ष्य करताना जरांगेंनी फडणवीस यांचा थेट उल्लेख केला. "भाऊ तुला एकदा सुट्टी दिली मराठ्यांनी. तू मराठ्यांचं वाटोळं केलं आहे. मराठ्यांच्याविरोधात तुच कोर्टात गेला आहेस. मराठ्यांविरोधात आग ओकणं कमी करा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब त्याला समज द्या. तो तुमचा कार्यकर्ता आहे. मराठे अंगावर घेऊ नका. याच मराठ्याने तुम्हाला 106 आमदार निवडून दिलेत. केंद्रात आणि राज्यात सत्ता आणण्यात मराठ्यांचा सिंहाचा वाटा आहे. पंतप्रधान साहेबांनी देवेंद्र फडणवीस साहेबांना समज द्या. खालचे कार्यकर्ते ते अंगावर घालत आहेत," असं म्हणत जरांगेंनी थेट पंतप्रधान मोदींना फडणवीसांना समज देण्याची मागणी केली.