Maratha Reservation Pune traffic changes : मराठा आरक्षणासाठी राज्याच्या मागासवर्ग आयोगाकडून सर्वेक्षण सुरु केलं असून, तिथं मनोज जरांगे आणि त्यांच्या समर्थनार्थ लाखो मराठा आंदोलक मुंबईच्या दिशेनं निघाले आहेत. जरांगे आणि त्यांच्यासमवेत असणारं हे भगवं वादळ मुंबईच्या दिशेने मार्गस्थ झालेलं असतानाच सध्या ही लाखोंची गर्दी पुणे जिल्ह्याच्या असून, जरांगे पाटील यांच्यासोबत आलेला लाखोंचा जनसमुदाय सकाळपासूनच महागणपतीच्या दर्शनासाठी लोटला आहे. इथून पुण्यातून हा मोर्चा पुढं मुंबईकडे निघणार आहे.
सोमवारी रांजणगावमध्ये मुक्कामी असलेला हा मोर्चा पुण्यातील खराडी बायपासच्या दिशेनं वाटचाल करणार आहे. मंगळवारी हा मोर्चा आज रात्री पुणे शहरातील खराडी बायपास चंदननगर येथे मुक्कामी असणार आहे. दरम्यान, या मोर्चाच्या धर्तीवर पुण्यातील वाहतुकीतही बदल करण्यात आले आहेत. त्यामुळं पुण्यात तुम्ही पिंपरी चिंचवडच्या दिशेनं जाणार असाल तर वाहतुकीच्या बदलांनाही विचारात घेऊन प्रवासाची आखणी करा.
मंगळवारी मनोज जरांगे यांच्यास आरक्षणासाठीचा मोर्ता खराडी भागात येणार आहे. यावेळी रांजणगाव, कोरेगाव भीमामार्गे खराडी-वाघोलीमध्ये मोठा जनसमुदाय दाखल होणार असल्यामुळं नगर रस्त्यावरील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत.
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरून नगरच्या दिशेनं जाणारी वाहतूक कात्रज, खडी मशिन चौक, मंतरवाडी फाटा, हडपसरमार्गे सोलापूर रस्ता, केडगाव चौफुलामार्गे, न्हावरे, शिरुरमार्गे नगर रस्त्याकडे वळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर, वाघोलीहून लोणीकंद आणि पुढे नगरच्या दिशेनं जाणारी वाहतूक थेऊर फाट्यावरून सोलापूर रस्त्याच्या दिशेनं जाईल, तर केडगाव, चौफुला, न्हावरे, शिरुरमार्गे नगरच्या दिशेनं वाहतूक पुढे जाईल.