नितेश महाजन, झी मीडिया, जालना : परतीच्या पावसामुळे जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कोट्यावधी रुपयांचा फटका बसला आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले असले तरी अजूनही काही ठिकाणी पंचनामे सुरु झाले नाहीत. त्यामुळे शेतमालाच्या नुकसानीचे पंचनामे करुन तातडीने नुकसान भरपाई द्या, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
जालना जिल्ह्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांची अक्षरशः झोप उडवली आहे. जिल्ह्यातील वाघरुळ गावात देखील असाच फटका परतीच्या पावसाने दिला आहे. राजू खरात या भाजीपाला उत्पादक शेतकऱ्याच्या टोमॅटो, भेंडी आणि मका पिकाला लाखोंचा फटका बसला आहे.
सततच्या पावसामुळे झाडावरच टोमॅटो सडल्यानं या शेतकऱ्यानं झाडावरील टोमॅटो काढुन फेकून दिले आहेत. अशीच अवस्था भेंडी पिकाची झाली आहे. त्यामुळे जमिनीवरील भेंडी काढून टाकली आहे. त्याचप्रमाणे मक्याच्या पिकाला कोंब फुटले आहेत.
याच गावातील प्रकाश खरात यांच्या मकाच्या गंजीत पाणी शिरल्यानं ८० क्विंटल मक्याच्या पिकाला फटका बसला आहे. त्यामुळे निसर्गाच्या प्रकोपापुढे हा शेतकरी हतबल झाला आहे. या गावातीलच नाही तर जिल्ह्यातल्या मका उत्पादकांचे हाल असेच आहे.
वाघरुळ गावात कपाशी, मका,सोयाबीन,भाजीपाला उत्पादकांची जशी वाईट अवस्था झाली आहे. जिल्ह्यात ४ लाख ३३ हजार ८९ हेक्टरवर नुकसान झालं आहे. ५ लाख ११ हजार शेतकरी या नुकसानीमुळे बाधित झाले आहेत. दरम्यान जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आल्याचे पालकमंत्र्यांनी म्हटलं आहे.